Savlyachi Janu Savali New Marathi Serial: मराठी प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. या महिन्यात काही नव्याकोऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यातच 'सावळ्याची जणू सावली' ही नवी मालिका देखील छोट्या पडद्यावर एन्ट्री घेत आहे. ही कथा सावली नावाच्या एका मुलीची आहे, जी रंग रूपाने साधारण, पण स्वभावाने प्रेमळ, शब्दाची पक्की आणि अत्यंत सुरेल आवाजाची आहे. सावली बारावीपर्यंत शिकली आहे आणि संगीतात एमए करणं, हे तिचं स्वप्न आहे. विठ्ठलावर अपार श्रद्धा असलेली, कितीही विपरीत स्थितीतून मार्ग निघू शकतो अशा आशावादी विचारांची कुटुंबावर अपाड प्रेम करणारी अशी ही सावली आहे.
सावलीच्या जन्मावेळी एक मोठी उलाढाल होते. कान्हुच्या पोटी जन्माला आलेली ही सावळ्या रंगाची मुलगी जन्मल्यावर श्वास घेत नसल्यामुळे, एकनाथला मेलेली मुलगी झाली अशा निष्कर्षापर्यंत गाव पोहोचत असताना, एकनाथ आपल्या मुलीला विठ्ठलाच्या चरणी ठेवतो आणि चमत्कार होतो. मुलीत प्राण फुकले जातात. म्हणून तिचे नाव सावली ठेवले जाते.
वडिलांच्या भजनी मंडळीत राहून सुरांचा वारसा तिलाही लाभतो. मात्र, तिच्या घरी तिच्या लहान भावाच्या म्हणजे अप्पुच्या जन्मानंतर सगळ्या गोष्टी कायमच्या बदलतात. हृदयाचा आजार असल्याने अप्पुच्या उपचारासाठी सतत पैशांची चणचण एकनाथला जाणवायला लागते. अशातच भैरवी वझे नावाच्या एका मोठ्या गायिकेची नजर सावलीच्या गायकीवर पडते. आपल्या मुलीला म्हणजे ताराला मोठी पार्श्वगायिका बनवण्याचे स्वप्ने पाहणारी भैरवी वझे परिस्थितीने गांजलेल्या सावलीच्या वडिलांसोबत म्हणजेच एकनाथ सोबत एक सौदा करते. अप्पुच्या इलाजासाठी पैसे देण्याच्या बदल्यात सावलीचा आवाज आपल्याकडे गहाण ठेवायला सांगते आणि अट ठेवते की, सावलीला स्वतःचे गाणे चारचौघात गाण्याचे स्वातंत्र्य कधीच नाही मिळणार. ती यापुढे फक्त तिच्या मुलीसाठी गाईल. अशा तऱ्हेने तारा वझे सावलीचा आवाज वापरून गायिका म्हणून नावारूपाला येऊ लागते. सावली आपल्या भावासाठी आणि कुटुंबासाठी या सगळ्याला आनंदाने सामोरी जाते.
त्याचवेळी शहरातल्या सगळ्यात मोठ्या कॉस्मेटीक्स कंपनीची मालकीण असलेली तिलोत्तमा आपल्या धाकट्या मुलासाठी म्हणजेच सारंगसाठी योग्य वधू शोधत असते. तिलोत्तमाच्या घरात, तिच्या जगात आसपास कुठेही कुरूप गोष्टीना जागा नाही. तिच्या घरात फक्त तीनच तऱ्हेच्या गोष्टी खपवून घेतल्या जातात. सुंदर.. अतिसुंदर आणि नितांतसुंदर! तिलोत्तमा सारंगवर जीवापाड प्रेम करते आणि अशा या घराशी कळत नकळत सावलीचे धागे जुळत जातात.
या मालिकेत सुलेखा तळवलकर, वीणा जगताप, साईंकित कामत, गौरी किरण अशा तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. या मालिकेचं अजून एक विशेष आकर्षण असणार आहे, ते म्हणजे या मालिकेत अभिनेत्री मेघा धाडे एका मत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. जवळपास २० वर्षानंतर मेघा पुन्हा मराठी डेली सोपमध्ये दिसणार आहे. काय होईल जेव्हा समोरा समोर येतील सावली आणि सारंग? काय होईल जेंव्हा तिलोत्तमाच्या सौंदर्याचं अमाप वेड असलेल्या जगात घडून येईल उलथापालथ? जगाला कधी कळू शकेल की भैरवी वझेच्या मुलीचा म्हणजे ताराचा खरा आवाज सावली आहे? विठ्ठलाची भक्त असलेली सावली कशी शोधेल तिच्या जीवनाची वाट? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मालिकेतून मिळणार आहेत.