Savlyachi Janu Savali Marathi Serial: मराठी मालिकांच्या भाऊगर्दीत आता आणखी एक नवी मालिका सामील होणार आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ असं या मालिकेचं नाव असून, या मालिकेतून एक नवंकोरं कथानक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठीवरील या नवीन मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर ‘सावली’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. प्राप्तीने या भूमिकेबद्दल बोलताना सावलीच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. सावली ही दिसायला जरी सावळी असली तरी, तिच्याच अनेक प्रतिभा आहेत. सावलीची गायन प्रतिभा, तिचे कुटुंब, तिचे आव्हान आणि तिचे स्वप्न या सगळ्यांचा समावेश या मालिकेत आहे.
सावली ही एक गायन प्रेमी, समंजस आणि जबाबदार तरुणी आहे. तिचे बाबा तिला लहानपणापासूनच गायन क्षेत्रात प्रोत्साहन देत होते. सावली विठ्ठलाची भक्त असून, तिचे कुटुंब वारकरी संप्रदायातील आहे. मात्र, तिच्या सावळ्या रंगामुळे समाजात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तरीही ती कधीच निराश होत नाही आणि सगळ्यांची मदत करायला तयार असते. सावलीच कुटुंब वारकरी संप्रदायातील आहे. तिच्या बाबांचं नाव एकनाथ, तर आईचं नाव कानू आहे. सावलीला दोन भाऊ देखील आहेत. मोठ्या भावाचं नाव सुखदेव असून, त्याच्या बायकोच नाव जयंती आहे. सावलीची वहिनी जयंती तिचा खूप तिरस्कार करते. तिच्या लहान भावाचं नाव अप्पू आहे, ज्याला हृदयाचा आजार आहे. असा सावलीचा परिवार आहे. याच परिवाराची कथा या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्राप्तीने बऱ्याच गोष्टींना उजाळा दिला. ‘सावली’ म्हणून तिची निवड कशी झाली, याचा किस्सा सांगताना प्राप्ती म्हणाली, ‘मी याआधी एक मालिका करत होते, तेव्हाच मला ‘सावळ्याची जणू सावली’साठी कॉल आला होता. मी ऑडिशन देण्यासाठी गेले. सावलीच्या ऑडिशनला मी तिच्यासारखा लूक केला होता. त्यांना पहिल्या टेकमध्येच माझं ऑडिशन खूप आवडलं. पण मी काही आशा ठेवली नव्हती की मला ही भूमिका मिळेलच. मला दुसऱ्यांदा कॉल आला, दुसऱ्या ऑडिशनसाठी ते ही त्यांना आवडलं. त्यानंतर एक दिवस लूक टेस्टसाठी कॉल आला. सावलीच्या लूकसाठी खूप प्रयोग केले. त्यानंतर मला माझी निवड झाल्याचं कळवण्यात आलं. आम्ही ठरवले होते की, जोपर्यंत प्रोमो नाही येत तोपर्यंत हे आपल्यातच ठेवायचं.’
प्राप्ती म्हणाली, ‘मला तो क्षण अजूनही लक्षात आहे, मी प्रवासात होते आणि ट्रेनमध्ये मी फोनवर प्रोमो पाहिला. नंतर आई-बाबांना कॉल केला की, घरी आल्यावर सरप्राईज आहे. माझे आई-बाबा सतत तो प्रोमो रात्री उशिरापर्यंत बघत होते. मला सर्वांचे कॉल आले. या मालिकेसाठी आम्ही आऊटडोअर लोकेशनवर ही शूट केले.