Savita Malpekar Shocking Revelation : मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सविता मालपेकर यांनी नुकतेच एका अभिनेत्रीविषयी धक्कादायक वक्तव्य केले आहे. मराठी मनोरंजन विश्वातील एका अभिनेत्रीने आपल्याला खूप त्रास दिल्याचे म्हणत त्यांनी थेट तिचे नावच सांगून टाकले आहे. सविता मालपेकर यांनी नुकतीच दिलीप ठाकूर यांना एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अभिनेत्री स्नेहलता तावडे-वसईकरविषयी बोलताना सविता मालपेकर यांनी संतापही व्यक्त केला.
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील 'सोयरा बाईसाहेब' म्हणून घराघरांत पोहोचलेल्या आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवणाऱ्या स्नेहलता तावडे हिच्यावर सविता मालपेकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. ‘इट्स मज्जा’च्या 'ठाकूर विचारणार' या मुलाखतीत सविता मालपेकर यांनी स्नेहलताकडून त्यांना झालेल्या त्रासावर भाष्य केले आणि या प्रकरणी आपल्या अनुभवांचा उलगडा केला.
सविता मालपेकर म्हणाल्या, ‘माझ्या कारकिर्दीतील ही पहिली मालिका असेल, ज्यात एका सहकलाकाराने मला खूप त्रास दिला. मी आजवरच्या कारकिर्दीत अनेक कलाकारांबरोबर काम केले आहे, जुन्या आणि नवोदित कलाकारांबरोबरही स्क्रीन शेअर केली आहे. पण, कधीच कुणी मला त्रास दिला नाही. कुणी पाठीमागे बोलत असतील, तर त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण, अभिनेत्री स्नेहलता तावडेने मला खूप त्रास दिला. त्यावेळी स्नेहलता रात्री उशिरा, अगदी १२ वाजताही चॅनेल हेड श्रावणी देवधरला फोन करुन काहीतरी सांगायची. आणि सकाळी मग त्यावरून सेटवर गोंधळ सुरू व्हायचा. या दरम्यान एक दिवसही श्रावणीला असं वाटलं नाही की, सविताला समोरून विचारावं की काय होतंय?’
त्यावेळी, सविता मालपेकर यांना खूप मानसिक त्रास होत होता, जो त्यांना सहन करणे कठीण झाले होते. या त्रासाला कंटाळूनच सविता यांनी ‘लक्ष्मी व्हर्सेस सरस्वती’ ही मालिका सोडली होती. सविता मालपेकर म्हणाल्या, ‘मला माझ्या कामाच्या आनंदापेक्षा त्यातून मिळणारे पैसे महत्त्वाचे नाहीत. ज्या ठिकाणी काम करून आपल्याला आनंद मिळत नाही, त्यांचे पैसे घेऊन काय उपयोग? पैसे तर सगळ्यांनाच मिळतात आणि त्यासाठीच सगळे काम करतात. पण, त्याचा अर्थ असा होत नाही की, अशा ठिकाणी मी काम करत राहीन. कामाचा आनंद मिळत असेल, तर मी पैसेही विचारात नाही.’
सविता मालपेकर यांनी 'दुर्गा व्हर्सेस सरस्वती' या मालिकेतील त्यांच्या हा अनुभव सांगितला. या मालिकेत त्यांनी लक्ष्मी नावाच्या कोळी स्त्रीची भूमिका साकारली होती. मालिकेच्या सेटवर झालेल्या त्रासामुळे त्यांनी ही मालिका सोडली होती. 'दुर्गा वर्सेस सरस्वती' या मालिकेच्या टीमविरोधात सविता यांनी अनेक आरोप केले होते, ज्यामुळे ते प्रकरण मीडिया आणि मनोरंजन उद्योगात खूप गाजलं होतं.