Satyashodhak Marathi Movie: धर्म व्यवस्थेच्या गुलामगिरीतून भारतीय समाजाला मुक्त करण्यासाठी क्रांतीची ज्योत पेटवणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा ‘सत्यशोधक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर उलगडण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची खूप चर्चा सुरू आहे. अभिनेते संदीप कुलकर्णी हे या चित्रपटात महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका साकारणार आहेत. आता या चित्रपटासंदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.
‘सत्यशोधक’ या चित्रपटाचा प्रीमियर शो नुकताच पार पडला आहे. या खास शोला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी देखील हजेरी लावली होती. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट पाहताना छगन भुजबळ यांनी त्याचं कौतुक केलं. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, ‘सत्यशोधक’ या चित्रपटातून क्रांतिज्योती महात्मा फुले यांच्या जीवनपटाची अतिशय उत्तम मांडणी केलेली आहे. तसेच, महात्मा फुले यांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी ‘सत्यशोधक’ हा चित्रपट महाराष्ट्र शासनाच्यावतीने लवकरच कर मुक्त करण्यात येईल, अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली.
यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ‘महात्मा फुले यांच्या विचारांची उत्तम मांडणी या चित्रपटात करण्यात आली आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य बघता एका चित्रपटातून त्यांचे विचार मांडता येऊ शकत नाहीत. त्यांच्या आयुष्यावर आधारित आणि त्यांचे वेगवेगळे विचार मांडणारे काही चित्रपट अजून बनायला हवेत. या चित्रपटातून देखील महात्मा फुले यांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याचे काम होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट सगळ्यांनी आवर्जून पाहायला हवा.’
अभिनेते संदीप कुलकर्णी आणि अभिनेत्री राजश्री देशपांडे यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘सत्यशोधक’ हा चित्रपट उद्या म्हणजेच ५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.