SatyaPrem Ki Katha Trailer: नात्यामधील गुंतागुंत सोडवू शकतील का कियारा-कार्तिक? नव्या चित्रपटाचा ट्रेलर बघाच...
SatyaPrem Ki Katha Trailer Out: या रोमँटिक कॉमेडी ड्रामामध्ये कार्तिक आर्यनच्या पात्राचे नाव ‘सत्यप्रेम’ आहे. तर, कियारा अडवाणी ‘कथा’ची भूमिका साकारत आहे.
SatyaPrem Ki Katha Trailer Out: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा आगामी चित्रपट ‘सत्यप्रेम की कथा’चा टीझर रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची जोडी पहिल्यांदा ‘भूल भुलैया’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली होती. त्याचवेळी, आता पुन्हा एकदा दोघेही ‘सत्यप्रेम की कथा’मध्ये रोमान्स करताना दिसणार आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
या रोमँटिक कॉमेडी ड्रामामध्ये कार्तिक आर्यनच्या पात्राचे नाव ‘सत्यप्रेम’ आहे. तर, कियारा अडवाणी ‘कथा’ची भूमिका साकारत आहे. दोघांची सुंदर प्रेमकथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. पण, यावेळी कथेचा अँगल जरा वेगळा आहे. लग्नानंतर जोडप्यांना येणाऱ्या अडचणी या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सत्यप्रेमची कथा गुजरातच्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे. चित्रपटात कार्तिकने एका साध्या गुजराती मुलाची भूमिका केली आहे, जो लग्नासाठी खूप उत्सुक आहे. तर, कियाराने एका आधुनिक गुजराती मुलीची भूमिका केली आहे, जी आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये आहे, परंतु कार्तिक देखील तिच्या प्रेमात पडतो.
सत्यप्रेम कथाला मिळवण्यासाठी कोणताही धोका पत्करण्यास तयार आहे. दरम्यान, या दोघांचे लग्न होईल, अशा पद्धतीने कथा फिरते. आयुष्याच्या या नव्या प्रवासात सत्यप्रेम इतका खूश आहे की, त्याच्या आनंदाला उधाण आलं आहे. पण, या नात्यात कथाला काहीतरी त्रास होत आहे, जो तिला या नात्यात टिकू देत नाहीय. आता लग्नाच्या या गुंतागुंतीच्या नात्यात दोघेही एकत्र राहू शकणार की वेगळे होणार, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे.
‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट समीर विद्वांस यांनी दिग्दर्शित केला आहे. तर, साजिद नाडियादवालाने चित्रपटाच्या निर्मितीची कमान सांभाळली आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट या वर्षी २९ जून रोजी सर्व सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट नावामुळे आधीच वादात सापडला होता. या चित्रपटाचे नाव सुरुवातीला ‘सत्यनारायण की कथा’ असे होते. मात्र, काही समुदायाने यावर आक्षेप घेताच हे नाव बदलण्यात आले.