‘मदर ऑफ कोरियोग्राफी’ हा किताब मिळवणारी बॉलिवूड डान्सर म्हणजे सरोज खान. त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. सरोज यांनी संपूर्ण करिअरमध्ये तब्बल २०००हून अधिक गाण्यांसाठी कोरिओग्राफर म्हणून काम केले होते. आज २२ नोव्हेंबर रोजी सरोज खान यांचा वाढदिवस आहे. आज जरी त्या आपल्यात नसल्या तरी, त्यांच्या आठवणी आणि त्यांची कला आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. बॉलिवूडमधील सगळ्या कलाकारांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या सरोज खान यांचा हा प्रवास अतिशय संघर्षमय होता. चला जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...
सरोज खान यांना अगदी लहान असताना म्हणजे वयाच्या १३व्या वर्षी लग्न करावे लागले होते. तेही २८ वर्षांनी मोठे असणारे डान्स मास्टर सोहनलाल यांच्याशी. ज्या वयात त्यांना लग्न या शब्दाचा अर्थ देखील माहित नव्हता त्या वयात त्यांचे लग्न लावून देण्यात आले होते. लग्नाच्या एका वर्षातच त्यांनी एका मुलाला जन्म दिला. यानंतर त्यांना एक मुलगी झाली. सगळं काही आनंदात सुरु असतानाच अवघ्या ८ महिन्यांत त्यांच्या मुलीचे निधन झाले. याच काळात त्यांच्या पतीने देखील त्यांची साथ सोडली.
सरोज खान यांच्या मुलीचे निधन झाले तेव्हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ सुरु होता. पण त्यांनी कधीही आपल्या आयुष्यातील दु:ख इतरांना सांगितले नाही. ८ महिन्यांच्या मुलीचा दफन विधी उरकल्यानंतर त्यांना लगेचच कामावर परतावं लागलं होतं. ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातील गाण्याच्या शूटिंगसाठी त्यांना बोलावण्यात आले होते. हा दुःखद प्रसंग त्यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितला होता. सगळ्याच गोष्टींसाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता.
वाचा: ए. आर. रेहमान गिटारवादक मोहिनीला करतोय डेट? दोघांनीही एकाच वेळी घटस्फोटाची घोषणा केल्याने चर्चांना उधाण
सरोज खान यांनी खासगी आयुष्यात केलेल्या संघर्षानंतर त्यांना करिअरमध्ये देखील सुरुवातीला संघर्ष करावा लागला होता. पण हळूहळू त्यांना काम मिळत गेले आणि त्या स्वत:ची काळजी घेऊ लागल्या. १७ जून २०२० रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मुंबईतील गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ३ जुलै २०२० रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. आज सरोज खान जरी आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांच्या असंख्य आठवणी आहे.