Vaibhavi Upadhyaya Car Accident: 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या लोकप्रिय शोमध्ये ‘जास्मिन’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे मंगळवारी सकाळी निधन झाले. हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला आहे. ती अवघ्या ३२ वर्षांची होती. चंदिगड येथून तिचे कुटुंबीय आज तिचे पार्थिव मुंबईत आणणार आहेत. वैभवी हिच्या पार्थिवावर मुंबईत, बुधवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
निर्माता-अभिनेता जेडी मजेठिया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रस्त्यावर वळण घेत असताना अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिची कार दरीत कोसळल्याने हा अपघात झाला, ज्यात वैभवीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या अपघातादरम्यान वैभवीसोबत तिचा भावी जोडीदार देखील होता. मात्र, त्याला किरकोळ दुखापत झाल्याचे म्हटले जात आहे.
अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिने 'सीआयडी' आणि 'अदालत' या सारख्या अनेक मालिकांमधून काम केले होते. मात्र, 'साराभाई व्हर्सेस साराभाई'मधील ‘जास्मिन’च्या भूमिकेने तिला तुफान लोकप्रियता मिळवून दिली होती. वैभवीच्या निधनावर शोक व्यक्त करताना निर्माता-अभिनेता जेडी मजेठिया म्हणाले की, 'ही बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. ती खूप चांगल्या मनाची व्यक्ती आणि एक हुशार अभिनेत्री होती. मात्र, तिच्यासोबत हे खूप वाईट घडलं आहे. आयुष्याबद्दल नक्की असं कधीच काही सांगता येत नाही. एक अद्भुत अभिनेत्री आणि प्रिय मैत्रीण वैभवी, ‘साराभाई व्हर्सेस साराभाईतील जास्मिन म्हणून कायम लक्षात राहशील.’
हिमाचल प्रदेशजवळ घडलेल्या या अपघातात वैभवीची कार दरीत कोसळली. रस्त्यावर वळण घेत असताना कार घसरून हा अपघात झाला. यावेळी वैभवीचा होणारा पती देखील तिच्यासोबत कारमध्ये होता. या अपघाताची माहिती कळताच वैभवीचे कुटुंब घटनास्थळी रवाना झाले. यानंतर आता तिचे कुटुंब पार्थिव घेऊन मुंबईत त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. आज (२४ मे) तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.