Sara Kahi Tichyasathi 27th October 2023 Serial Update: 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत आता दोन बहिणी मिळून मोठं पाऊल उचलताना दिसणार आहेत. ओवी खोतांच्या घरात आल्यापासून या घरातील कर्मठ वृत्तींना झुगारून लावताना दिसत आहे. मुलींनी केवळ शिक्षण, चूल आणि मूल इतकंच सांभाळावं असा या घराचा नियम होता. मात्र, परदेशात वाढलेल्या ओवीने या सगळ्यांना झुगारून लावलं आणि प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करायचा विडाच उचलला आहे. यात तिने उमाच्या मनात लपलेली नृत्य कला सगळ्यांसमोर आणली. तर, आता ती बहिणीचं स्वप्न देखील पूर्ण करणार आहे. ओवी आता निशीच्या स्वप्नाला पाठिंबा देताना दिसणार आहे. मात्र, या वाटेत आता रघुनाथराव आडवे येणार आहेत.
निशीला बालपणापासूनच बॅडमिंटन या खेळाची आवड होती. मात्र, तिने आपल्या वडिलांना म्हणजेच रघुनाथरावांना घाबरून आपलं हे स्वप्न मनाच्या एका कप्प्यात बंद करून ठेवलं होतं. मात्र, आता हे स्वप्न ओवीच्या समोर आलं आहे. एका प्रसंगी निशीच्या हातून सायना नेहवालचा फोटो खाली पडला. यामुळेच ओवीला तिच्या या स्वप्नाबद्दल कळलं. आता ओवी निशीची साथ देऊन तिला बॅडमिंटन खेळायला लावणार आहे. तर, ओवीने प्रोत्साहन दिल्याने आता निशी गावातील एक बॅडमिंटन स्पर्धेत भाग घेणार आहे.
सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे घडत असताना अचानक तिथे रघुनाथराव येणार आहेत. निशीचे वडील रघुनाथराव खोत हे संपूर्ण गावातील एक मोठं प्रस्थ आहे. त्यांच्या शब्दाला पूर्ण गावात मान आहे. त्यामुळेच या बॅडमिंटन स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यासाठी रघुनाथ खोतांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं आहे. अचानक तिथे आलेल्या रघुनाथरावांना पाहून आता निशी आणि ओवीसमोर अनेक प्रश्न उभे राहणार आहेत. त्यांच्या समोर आलेल्या या संकटाची चाहूल त्यांना आधीच लागली आहे. त्यामुळे आता त्या या परिस्थितीतून कशा बाहेर पडतील हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या