Sara Kahi Tichyasathi 15 September 2023: दोन बहिणींची कथा सांगणारी ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहे. आता या मालिकेत रंजक कथानक पाहायला मिळणार आहे. कोकणात राहणारी उमा आणि लंडनमध्ये जाऊन स्थायिक झालेली संध्या या दोन्ही बहिणींच्या आयुष्यात आता एक कठीण वेळ आली आहे. संध्याच्या तब्येतीची माहिती कळताच तातडीने उमा लंडनला गेली होती. यावेळी तिने आपला सगळा राग रुसवा बाजूला ठेवून केवळ नात्याचा विचार केला होता. मात्र, आता उमा मोठ्या कोंड्यात अडकली आहे.
२० वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेमुळे दोन्ही बहिणींच्या आयुष्यात मोठं वादळ आलं होतं. उमाच्या लग्नात तिच्याच होणाऱ्या पतीसोबत लग्न केल्याने संध्यावर सगळ्यांनीच बहिष्कार टाकला होता. या दिवसापासून सगळ्यांनीच तिच्याशी असलेले संबंध तोंडून टाकले होते. तर, उमाच्या पतीने देखील तिला एक अट घालून स्वतःच्या बहिनिपासून पूर्णपणे तोडले होते. मात्र, दोन्ही बहिणी मनोमन एकमेकींची आठवण काढून, एकमेकींसाठी प्रार्थना करत होत्या. शरीराने दूर असल्यातरी मनाने मात्र त्या एकमेकींच्या अतिशय जवळ होत्या.
संध्यापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या उमाला आपल्या बहिणीच्या आवाजातील कणकण जाणवली आणि तिचं मनं बहिणीच्या दिशेने धाव घेऊ लागलं. आपल्या पत्नीची उमाची तळमळ बघून खोतांनी देखील आपली २० वर्षांपूर्वीची अट मागे घेऊन उमाला परदेशी जाण्याची परवानगी दिली. मात्र, उमा परदेशी पोहोचताच संध्याला कॅन्सर झाल्याची वाईट बातमी कळली. यावेळी संध्याने बहीण उमाला ओवीची जबाबदारी सोपवली आणि या जगाचा निरोप घेतला. आता संध्याची लेक ओवी आता उमासोबत कोकणात आली आहे.
लंडनमध्ये जन्मलेली आणि तिथेच लहानाची मोठी झालेली ओवी अतिशय मॉर्डन मुलगी आहे. तिच्या राहणीमानावर देखील पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आहे. मात्र, तिच्या कोकणात येण्याने आता संपूर्ण गावात खळबळ माजली आहे. ओवीचे रंगवलेले केस, तिचं शॉर्ट्स घालून गावात वावरणं गावातील महिला वर्गाला फारसं रुचलेलं नाही. यावरून त्यांनी तिला आणि खोतांना नावं ठेवण्यास सुरुवात केली आहे. आता ही चर्चा खोतांच्या घरापर्यंत पोहोचल्यावर काय होणार? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.