मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Santosh Chordiya: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध विनोदी कलाकाराचे निधन; ५७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Santosh Chordiya: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध विनोदी कलाकाराचे निधन; ५७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dec 13, 2023 11:40 AM IST

Santosh Chordiya Passes Away: अभिनेते रवींद्र बेर्डे, हॉलिवूड स्टार आंद्रे ब्राउगर यांच्यानंतर आता प्रसिद्ध विनोदी कलाकार संतोष चोरडिया यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे.

Santosh Chordiya Passes Away
Santosh Chordiya Passes Away

Santosh Chordiya Passes Away: आज मनोरंजन विश्वासाठी अतिशय दुःखद दिवस आहे. एकाच दिवशी मनोरंजन विश्वातील तीन प्रसिद्ध कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेते रवींद्र बेर्डे, हॉलिवूड स्टार आंद्रे ब्राउगर यांच्यानंतर आता प्रसिद्ध विनोदी कलाकार संतोष चोरडिया यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे. वयाच्या अवघ्या ५७व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने मंगळवारी (१३ डिसेंबर) सकाळी त्यांचे निधन झाले आहे. 'आम्ही एकपात्री' या संस्थेतून त्यांनी एकपात्री प्रयोग करणाऱ्या सगळ्या कलाकारांना एकत्र आणले होते. आपल्या विनोदी एकपात्री प्रयोगांनी त्यांनी सगळ्यांनाच भरपूर हसवले होते.

एकपात्री कला सादर करणाऱ्या कलाकारांच्या समस्यांना देखील त्यांनी वाचा फोडली होती. कलेसोबतच ते त्यांच्या स्वभावामुळे देखील लोकांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांच्या अचानक एक्झिटमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. संतोष चोरडिया यांच्या पार्थिवावर आज (१३ डिसेंबर) दुपारी ४ वाजता पुण्यातील नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा अजिंक्य, मुलगी अपूर्वा आणि एक भाऊ असा परिवार आहे. पुण्यातील राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

टीव्ही, चित्रपट आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. गेली ३८ वर्षे ते मनोरंजन विश्वात कार्यरत होते. त्यांनी 'दुसरी गोष्ट' , 'कॅपॅचिनो', 'सरगम', 'दगडाबाईची चाळ', 'प्रेमा' अशा अनेक मराठी गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. त्यांनी 'जीना इसी का नाम है' आणि 'फुल २ धमाल' या कार्यक्रमांची निर्मिती आणि सादरीकरणाची धुरा देखील सांभाळली होती. केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही त्यांनी आपल्या कलेचा जलवा दाखवला होता. आपल्या 'हसवा हसवी' या एकपात्री प्रयोगातून त्यांनी लंडन,इस्राइल, ओमान येथील रसिक प्रेक्षकांना खळखळवून हसवले होते. जगभरातील चाहते त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त करत आहेत.

WhatsApp channel