Sanjay Dutt In Gaya: बॉलिवूडचा ‘संजू बाबा’ अर्थात अभिनेता संजय दत्त सध्या बिहारमधील गया या ठिकाणी पोहचला आहे. गया येथे गेलेल्या अभिनेत्याने नुकताच पिंडदान विधी केला आहे. संजय दत्तने वडील सुनील दत्त आणि आई नर्गिस दत्त यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून, गयाच्या विष्णुपद मंदिरात जाऊन पिंडदान आणि तर्पण विधी पूर्ण केले आहेत. यादरम्यान संजय दत्तचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये संजय दत्त हे विधी करताना दिसला आहे. अभिनेता संजय दत्त एका खाजगी चार्टर्ड विमानाने गयाला रवाना झाला होता. संजय दत्तच नव्हे, तर त्याच्या वडिलांनी म्हणजेच सुनील दत्त यांनीही याच ठिकाणी आपल्या पूर्वजांसाठी पिंडदान केले होते.
संजय दत्त याचे वडील अभिनेते सुनील दत्त यांचे २५ मे २००५ रोजी, तर आई अभिनेत्री नर्गिस दत्त यांचे ३ मे १९८१ रोजी निधन झाले होते. सुनील दत्त आणि नर्गिस दत्त ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोठी नावं आहेत. आपल्या आई-वडिलांच्या मृतात्म्याला शांती मिळावी म्हणून संजय दत्तने आपले मुलाचे कर्तव्य पार पाडले आहे. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास संजय दत्त गया येथील विष्णुपद मंदिरात पोहोचला होता. अभिनेता मंदिरात पोहोचण्यापूर्वीच या श्राद्धविधीची पूर्वतयारी करण्यात आली होती.
विष्णुपद संकुलात असलेल्या हनुमान मंदिरात संजय दत्त याने पिंडदान विधी केला. विधीच्या वेळी संजय दत्त भारतीय पोशाखात दिसला होता. पांढरा कुर्ता-पायजमा परिधान करून अभिनेता संजय दत्त याने हे धार्मिक विधी पूर्ण केले. या दरम्यान गयामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
हिंदू धर्मात पिंडदानाच्या विधीला खूप महत्त्व आहे. गया येथे दरवर्षी अश्विन महिन्यात पितृपक्ष मेळावा आयोजित केला जातो. यावेळी, देशभरातील भाविक गया येथे जाऊन आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान विधी करतात. हाच हिंदू धर्मातील महत्त्वाचा विधी संजय दत्त याने आपल्या आई-वडील आणि पूर्वजांसाठी केला आहे. अभिनेता संजय दत्त मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. ‘केजीएफ चॅप्टर २’मधून त्याने पुन्हा एकदा आपला दमदार अंदाज दाखवला होता.
संबंधित बातम्या