मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  SangharshYoddha Movie: मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री!

SangharshYoddha Movie: मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 12, 2024 10:28 AM IST

SangharshYoddha Movie Manoj Jarange Patil Wife: आरक्षणासाठी लढणारा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीचा पत्नीचा संघर्षही तितकाच मोठा आहे.

SangharshYoddha Movie Manoj Jarange Patil Wife
SangharshYoddha Movie Manoj Jarange Patil Wife

SangharshYoddha Movie Manoj Jarange Patil Wife: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी आता ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटातून मांडली जाणार आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीच्या भूमिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. एका लढवय्या कार्यकर्त्याच्या लढवय्या पत्नीची ही भूमिका असून, सुरभी हांडे यामध्ये आपला दमदार अभिनय दाखवताना दिसणार आहे. 'संघर्षयोद्धा' हा चित्रपट २६ एप्रिल रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आजवरच्या वाटचालीत त्यांच्या पत्नीची सौमित्रा जरांगे पाटील यांची जबाबदारी महत्त्वाची ठरलीय. मनोज जरांगे पाटील समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढत असताना घरच्या आघाडीवर त्यांची पत्नी लढत होती. त्यामुळेच जरांगे पाटील हे वादळ महाराष्ट्रभर फिरू शकलं. त्यामुळे आरक्षणासाठी लढणारा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीचा पत्नीचा संघर्षही तितकाच मोठा आहे. त्यामुळे एका लढवय्या कार्यकर्त्याच्या पत्नीच्या संघर्षाची कहाणी या चित्रपटात दाखवली जाणार आहे. ही आव्हानात्मक भूमिका अभिनेत्री सुरभी हांडे साकारत आहे.

Vanita Kharat: ‘१ तासाची सोय होईल का?’; अभिनेत्री वनिता खरातला दादर स्टेशनवर आलेला भयानक अनुभव!

ही भूमिका खूप वेगळी: सुरभी हांडे

‘जय मल्हार’, ‘गाथा नवनाथांची’, ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ अशा टीव्ही मालिका, ‘अगं बाई अरेच्चा २’ अशा चित्रपटांतून सुरभीनं आपल्या अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. सुरभी हांडे हिच्या आजवरच्या भूमिकांमध्ये ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटातली भूमिका सर्वांत वेगळी ठरणार आहे. जरांगे पाटील पती-पत्नीचं नातं या चित्रपटातून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे आता हे नातं मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी प्रेक्षकांना २६ एप्रिलपर्यंतच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दिग्गज कलाकारांची फौज

सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारत असलेले रोहन पाटील, अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख हे देखील उपस्थित होते. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मितीची बाजू सांभाळली आहे. सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद केले आहे, तर शिवाजी दोलताडे दिग्दर्शनाची जबाबदारी निभावत आहेत. चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

IPL_Entry_Point