मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा; प्रशांत दामले यांच्यासह ‘या’ कलाकारांचा होणार सन्मान!

संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा; प्रशांत दामले यांच्यासह ‘या’ कलाकारांचा होणार सन्मान!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 26, 2022 08:15 AM IST

Sangeet Natak Akademi Awards: संगीत नाटक अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशिप आणि पुरस्कारांच्या यंदाच्या यादीत मराठी मनोरंजन विश्वातील मातब्बर कलाकारांनी स्थान मिळवलं आहे.

Meena Naik And Prashant Damle
Meena Naik And Prashant Damle

Sangeet Natak Akademi Awards: कलाक्षेत्रातील मानाचा पुरस्कार अशी ओळख असलेल्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) जाहीर झालेल्या संगीत नाटक अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशिप आणि पुरस्कारांच्या यंदाच्या यादीत मराठी मनोरंजन विश्वातील मातब्बर कलाकारांनी स्थान मिळवलं आहे. यंदा २०१९ ते २०२१ अशा तीनही वर्षांचे पुरस्कार एकत्रित जाहीर करण्यात आले आहेत. अभिनेते प्रशांत दामले, ज्येष्ठ अभिनेत्री-लेखिका मीना नाईक आणि गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना ‘संगीत नाटक अकादमी’च्या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे.

अभिनेते प्रशांत दामले यांनी त्याच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून या संदर्भात माहिती दिली. एक पोस्ट शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ‘आपल्या सर्वांच्या अलोट प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे मला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला. असंच प्रेम असु दे’, असं त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे. चित्रपट, मालिका आणि नाटक अशी तीनही क्षेत्र गाजवणारे अभिनेते अशी प्रशांत दामले यांची ओळख आहे. नुकताच त्यांनी आपल्या नाट्य कारकिर्दीतील १२,५००वा प्रयोग सादर केला. आता त्यांच्या या आनंदाच्या बातमीवर चाहते देखील भरभरून प्रतिक्रिया देत आहे.

तर, अभिनेत्री-निर्माती मानवा नाईक हिने देखील एक पोस्ट शेअर करत आपल्या आईला अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री-लेखिका मीना नाईक यांना ‘संगीत नाटक अकादमी’चा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा केली. ‘मला हे सांगताना खूप आनंद होतोय की, माझी आई मीना नाईक हिला संगीत नाटक अकादमीचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे. गायन क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी शास्त्रीय संगीत गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना देखील संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी संगीत नाटक अकादमी दरवर्षी या पुरस्कारांची घोषणा करते.

IPL_Entry_Point

विभाग