गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावर अनेक नव्या मालिका येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच 'आई तुळजाभवानी' या नव्या मालिकेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच कलर्स मराठी वाहिनीचा नवा लूक लाँच करण्यात आला. आता त्या पाठोपाठ आणखी एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेचे नाव 'दुर्गा' असे असून प्रोमो प्रदर्शित झाला आहे.
'दुर्गा' या मालिकेचा दमदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुख आणि सूड अशा द्वंद्वात अडकलेली, आपल्या कुटुंबासाठी सर्वकाही पणाला लावून त्यांना न्याय मिळावा म्हणून लढणाऱ्या दुर्गावर आधारित ही मालिका आहे. आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध दुर्गा कशी घेणार हे जाणून घेणे उत्सुकतेचे असणार आहे.
कोणते कलाकार दिसणार?
दुर्गाच्या भूमिकेत संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे झळकणार असून मालिकेचा नायक अभिषेकची भूमिका अंबर गणपुले साकारणार आहे. तसेच शिल्पा नवलकर, राजेंद्र शिसतकर आणि वृंदा गजेंद्र देखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
'दुर्गा' हे पात्र साकारणारी रूमानी खरे म्हणाली ,"मालिकेचं कथानक ऐकल्या क्षणी आवडलं.'दुर्गा' हे पात्र वेगळं आहे. स्वत:ची मतं ठामपणे मांडू शकणारी, स्वत:साठी उभी राहणारी अशी 'दुर्गा' आहे. 'दुर्गा'च्या माध्यमातून चांगल्या माणसांसोबत छान काम करता येत आहे. मुळात कोणतीही गोष्ट उभी राहताना पडद्यामागच्या कलाकारांची मेहनत खूप महत्त्वाची असते. सेटवर असणारी सकारात्मकता उत्तम काम करण्यासाठी प्रोत्साहन देते. 'दुर्गा' हे पात्र साकारताना मला मजा येतेय. प्रेक्षकांनादेखील हे पात्र नक्कीच आवडेल."
वाचा: रणवीर सिंगनंतर अभिनेत्रीने केले अर्धनग्न अवस्थेत फोटोशूट, नेटकऱ्यांनी केली जोरदार टीका
संदीप खरे यांची लेक रुमानी खरे हिने अभिनयाचे धडे घेतले आहेत. तिने यापूर्वी काही नाटकांमध्ये काम केले आहे. तिने रंगभूमी गाजवली होती. आता ती मालिकेत दिसणार असल्यामुळे सर्वजण आनंदी आहेत. रुमाली ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. ती सतत वडिलांसोबत फोटो शेअर करताना दिसते. तिने ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत राधा ही भूमिका साकारली होती.