
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू नेहमीच चर्चेत असते. व्यावसायिक आयुष्यामुळेच नाही, तर अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील प्रसिद्धी झोतात येते. समंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाला आता बराच काळ लोटला असला, तरी आजही या दोघांची चर्चा सुरूच आहे. यातच नागा चैतन्य याने दुसऱ्या अभिनेत्रीशी साखरपुडा केल्यानंतर या चर्चांना आणखीनच हवा मिळाली आहे. दरम्यान आता तेलंगणाच्या कॅबिनेट मंत्री कोंडा सुरेखा यांनी नागा चैतन्य आणि समंथा यांच्या घटस्फोटाचे कारण बीआरएसचे अध्यक्ष केटी रामाराव असल्याचे विधान केले होते. यावर आता समंथाने आपलं उत्तर दिलं आहे.
समंथाने पोस्ट लिहित कोंडा सुरेखा यांना उद्देशून म्हटले की, ‘एक मंत्री म्हणून तुमच्या बोलण्याला खूप महत्त्व आहे आणि तुम्ही इतरांच्या प्रायव्हसीचा आदर केला पाहिजे, हे तुमच्या लक्षात यायला हवं होतं.’
समंथा रुथ प्रभूने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहिली आहे. यात अभिनेत्री म्हणाली की, ‘एक महिला असणे, बाहेर पडून काम करणे आणि ग्लॅमरस इंडस्ट्रीमध्ये टिकून राहणे, जिथे स्त्रियांना मुख्यत: एखाद्या वस्तूसारखे वागवले जाते. प्रेमात पडणे आणि प्रेमात करणे, एकमेकांसोबत उभे राहणे आणि त्यासाठी भांडणे... यासाठी खूप हिंमत लागते. कोंडा सुरेखा गारू, मला माझ्या प्रवासाचा अभिमान आहे, कृपया त्याचा असा अनादर करू नका. मंत्री म्हणून तुमचे शब्दांना आणि तुमच्या बोलण्याला खूप महत्त्व आजे, हे तुम्हाला कळेल अशी आशा आहे. मी तुम्हाला विनंती करतो की, लोकांच्या प्रायव्हसीचा आदर करा.’
अभिनेत्रीने तिच्या घटस्फोटावर बोलताना पुढे लिहिले की, ‘माझा घटस्फोट ही माझी वैयक्तिक बाब आहे आणि मी तुम्हाला विनंती करेन की याबद्दल कोणतेही अंदाज बांधू नका. गोष्टी खाजगी ठेवण्याच्या आमच्या निर्णयाचा अर्थ चुकीचे विधान आहे, असा होत नाही. मी स्पष्ट करू इच्छिते की, आमचा घटस्फोट आम्हा दोघांच्या संमतीने झाला होता आणि त्यात कोणतेही राजकीय षडयंत्र नव्हते. कृपया माझे नाव तुमच्या राजकीय विषयापासून दूर ठेवाल का?’
समंथा आणि नागा घटस्फोटानंतर आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. समंथा तिच्या कामात व्यस्त आहे, तर नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत साखरपुडा केला आहे आणि दोघेही लवकरच लग्न करणार आहेत.
संबंधित बातम्या
