अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्यावर पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची वेळ आली आहे. समंथा गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या आजारांचा सामना करत आहे. मात्र, या सगळ्यातून देखील ती स्वतःला अतिशय पॉझिटिव्ह ठेवून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. एकीकडे अभिनेत्री स्वतःला खंबीरपणे कामात गुंतवून घेत असताना, दुसरीकडे तिला आता सेटवर दुखापत झाल्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागली आहे. अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्या मागे संकटांचं शुक्लकाष्टाचं लागलं आहे. एकीकडे समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच, नागा चैतन्य यांने दुसऱ्यांदा संसार थाटला. मात्र, समंथा अजूनही सिंगल आहे.
तिने स्वतःला कामांमध्ये पूर्णपणे बुडवून घेतले. सध्या अभिनेत्री तिच्या आगामी ॲक्शन चित्रपटावर काम करत होती. मात्र, या चित्रपटादरम्यान अभिनेत्रीला गंभीर दुखापत झाली आहे. समंथाने स्वतः तिच्या चाहत्यांसोबत ही दुखापत आणि त्याचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून नुकतीच एक स्टोरी पोस्ट केली आहे, जी बघून आता तिचे चाहतेही काळजीत पडले आहेत. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक असा फोटो शेअर केला आहे, जो पाहून तिच्या चाहत्यांना अभिनेत्रीची खूपच काळजी वाटू लागली आहे.
या फोटोमध्ये समंथाला किती वेदना होत असतील, हे स्पष्टपणे दिसत आहे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एक भीषण अपघात झाला आणि या अपघातात अभिनेत्री जखमी झाली आहे. या अपघातात समंथा रुथ प्रभूच्या गुडघ्याला मार लागला आहे. समंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर तिच्या गुडघ्याचा एक फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या गुडघ्यावर दोन सुया टोचण्यात आल्या आहेत. ती आता ॲक्यूप्रेशर ही उपचार पद्धती वापरत आहे.
आपली हेल्थ अपडेट देताना अभिनेत्रीने लिहिले की, ‘मी कोणत्याही दुखापती शिवाय ॲक्शन स्टार होऊ शकत नाही का?’ तिची ही पोस्ट सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर, चाहते आता अभिनेत्रीला काळजी घेण्याचा सल्ला देत आहे. तिने शेअर केलेला फोटोमध्ये तिच्या गुडघ्याला चांगली दुखापत झालेली दिसत आहे. या दुखापतीमुळे अभिनेत्रीला नक्कीच भरपूर वेदना होत असतील, हाच विचार करून तिचे चाहते देखील आता काळजीत पडले आहेत.