Bigg Boss 18 Vs Lock Upp 2 clash: छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस ओटीटी ३’ संपताच प्रेक्षक ‘बिग बॉस सीझन १८’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खानच्या शोची चाहत्यांना खूप उत्सुकता लागून राहिली आहे. एकीकडे सलमानच्या शोची चर्चा सुरू असताना आता दुसरीकडे, ‘पंगा क्वीन’ कंगना रनौतचा शो ‘लॉकअप सीझन २’ची चर्चाही जोर धरू लागली आहे. कंगनाचा शो ‘लॉकअप’चा दुसरा सीझनही लवकरच सुरू होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. यानिमित्ताने कंगना रनौत आणि सलमान खान यांच्यात टीव्हीवरची सर्वात मोठी टक्कर देखील पाहायला मिळणार आहे.
टेलिचक्करच्या रिपोर्टनुसार, कंगना रनौतचा शो लॉकअपचा दुसरा सीझन ५ ऑक्टोबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सलमान खानच्या या शोबाबतही अशी बातमी समोर येत आहे की, ५ ऑक्टोबरपासून या शोचा प्रीमिअरही होणार आहे. मात्र, या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. पण, जर असे झाले तर टीव्ही विश्वातील सर्वात मोठा संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सलमान खानचा शो बिग बॉसचा स्वतःचा एक मोठा चाहतावर्ग आहे. आतापर्यंत बिग बॉसचे १७ सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तर, कंगना रनौतचा शो लॉकअपचा पहिला सीझन २०२२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर २०२४मध्ये याचा दुसरा सीझन चर्चेत आला आहे. कंगना रनौतच्या या शोला ही खूप प्रेम मिळालं आहे. 'लॉकअप सीझन १'चा विजेता मुनव्वर फारुकी ठरला होता. यानंतर मुनव्वरने ‘बिग बॉस सीझन १७’ची ट्रॉफी देखील जिंकली होती. यानंतर मुनव्वर प्रचंड चर्चेत आला होता.
सध्या छोट्या पडद्याच्या विश्वात ‘बिग बॉस १७’बद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. या सीझनमध्ये कोण कोण सहभागी होणार, याविषयी देखील वेगवेगळे कयास बांधले जात आहेत. ‘बिग बॉस’च्या या नव्या सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या काही नावांचीही चर्चा सुरू झाली आहे. या नावांमध्ये अर्जुन बिजलानी, शोएब इब्राहिम, दीपिका आर्या आणि मानसी श्रीवास्तव यांचा समावेश आहे.