Salman Khan Security Increased : मुंबईत झालेल्या बाबा सिद्दीकी हत्याकांडानंतर आता बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान याच्या जीवाला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन त्याची सुरक्षा वाढवण्यात आले आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटभोवती सुरक्षा वाढवण्यासोबतच सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे बऱ्याच दिवसांपासून सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याच्या घरावर गोळीबार देखील झाला होता. आता बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर या टोळीची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी भाईजानच्या सुरक्षेचा तगडा बंदोबस्त केला आहे.
सलमान खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली असून, यात त्याच्या सुरक्षेसाठी आठ ते दहा पोलिसांची तुकडी बंदुकांसह तैनात करण्यात आली आहे. यापैकी काही पोलीस त्याच्यासोबत सगळीकडे जातील. सलमान खान कुठल्याही ठिकाणी जाण्यापूर्वी त्या ठिकाणची सुरक्षा तपासणी केली जाईल. सलमान खानच्या घराच्या चारही बाजूंना पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, बँड स्टँडच्या आसपास आणि गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ ६०हून अधिक साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आले आहेत, जे आजूबाजूला घडणाऱ्या संशयास्पद क्रियाकलपांवर नियंत्रण ठेवण्यासाठी २४ तास कार्यरत असतील. यासोबतच मुंबई पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर चेहरे ओळखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हाय-रेज्युलेशन सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले आहेत. हे कॅमेरे जवळून जाणाऱ्या व्यक्तींना सहज ओळखू शकतात. जर, एकच चेहरा तीन पेक्षा जास्त वेळा या कॅमेरात टिपला गेला, तर ते सिक्युरिटी सिस्टमला अलर्ट करतील. तर, कमांड सेंटरमध्ये असलेले पोलीस २४ तास या परिसरावर लक्ष ठेवून राहतील.
यापूर्वी एप्रिलमध्ये घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर सलमानच्या घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले होते. इतकी सुरक्षा व्यवस्था असतानाही बिश्नोई गॅंगमधील लोकांनी सलमान खानच्या घराबाहेर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या सलमान खानच्या घराबाहेर अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सलमान खानच्या इमारतीबाहेर महिला अधिकाऱ्यांसह तब्बल ६० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची बारकाईने तपासणी केली जात आहे. आता कोणताही अनोळखी व्यक्ती गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर उभा देखील राहू शकणार नाही.