Salman Khan News : आता भाईजानची झलक मिळणंही मुश्कील, सलमान खानची बाल्कनीही झाली बुलेटप्रूफ!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan News : आता भाईजानची झलक मिळणंही मुश्कील, सलमान खानची बाल्कनीही झाली बुलेटप्रूफ!

Salman Khan News : आता भाईजानची झलक मिळणंही मुश्कील, सलमान खानची बाल्कनीही झाली बुलेटप्रूफ!

Jan 08, 2025 08:56 AM IST

Salman Khan House Security : आता सलमान खानच्या घराला कोणी टार्गेट केलं, तरी त्याच्या घराच्या भिंतींचंही नुकसान होणार नाही. जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर आता त्याच्या घरात सुरक्षेच्या दृष्टीने अनेक बदल करण्यात आले आहेत.

सलमान खान
सलमान खान

Salman Khan House Security : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटमधील त्याच्या फ्लॅटची बाल्कनीही झाकून टाकण्यात आली आहे. त्याच्या फ्लॅटच्या नव्या फोटोंमध्ये घराची बाल्कनी बुलेटप्रूफ काचेने झाकलेली दिसत आहे. म्हणजेच आता सलमान खानच्या फ्लॅटला कोणी टार्गेट केलं, तरी त्याच्या घराच्या भिंतींनाही काही नुकसान होणार नाही. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांना अनेक धमक्या मिळाल्या होत्या. त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अशा प्रकारे सलमान खानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आल्याने बाल्कनीतून सलमान खानची एक झलक पाहायला येणाऱ्या चाहत्यांची निराशा झाली आहे.

सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सलमान खानच्या फ्लॅटची बाल्कनी बुलेटप्रूफ काचेने झाकण्यात आली आहे. या आधीच याच बाल्कनीतून सलमान खान आपल्या चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारायचा आणि त्यांना भेटायचा. मात्र, आता ही बाल्कनी पूर्णपणे झाकली गेली असून, चाहत्यांना सलमान खान दिसणार नाही. 

आता चाहत्यांना सलमान दिसणार नाही!

ईद, वाढदिवस आणि इतर सणांना सलमान खान अनेकदा याच बाल्कनीत उभा राहून चाहत्यांना भेटायचा आणि त्यांना हात दाखवून अभिवादन करायचं.  त्याची एक झलक पाहण्यासाठी शेकडो चाहते त्याच्या घराबाहेर उभे असतात. सलमान खाननेही चाहत्यांना कधीच निराश केले नाही आणि अनेकदा इथे येऊन आपली वाट बघणाऱ्या चाहत्यांना हात दाखवत असे. पण, आता आता या सगळ्या गोष्टी बंद होणार असल्याने सगळ्यांचाच हिरमोड झाला आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर वाढवली सुरक्षा!

सलमान खानचे जवळचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षी हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली होती आणि सलमान खानशी जवळीक असल्यामुळेच त्याची हत्या झाल्याचा दावा करण्यात आला होता. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात सलमान खानही या टोळीच्या निशाण्यावर होता, असेही म्हटले आहे. पण, त्याच्या कडक सुरक्षेमुळे ही टोळी कधीच सलमान खानला लक्ष्य करू शकली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानचा जवळ असल्याने बाबा सिद्दीकीची हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जीशान याने माध्यमांना सांगितले होते की, माझ्या वडिलांच्या हत्येमुळे सलमान खानदेखील खूप दु:खी होता आणि तो अनेक रात्री नीट झोपू शकला नाही.

Whats_app_banner