बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर आता या जगात नाहीत, पण त्यांचे कुटुंब आणि चाहत्यांनी नेहमीच त्यांना आपल्या आठवणींमध्ये जिवंत ठेवले आहे. ऋषी कपूर यांचे कुटुंबीय अनेकदा त्यांच्याबद्दल काही ना काही शेअर करत असते. आपल्या आवडत्या अभिनेत्याबद्दल न ऐकलेल्या गोष्टी ऐकून चाहतेही खूश होतात. ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी हिंदी चित्रपटांचे दमदार सुपरस्टार राज कपूर यांच्या घरी झाला. फिल्मी वातावरणात वाढलेल्या ऋषी कपूर यांनी अगदी लहान वयातच अभिनयाला सुरुवात केली. पण ऋषी कपूर यांना सलीम-जावेद या जोडीने धमकी दिली होती.
एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी जोडी म्हणजे सलीम खान आणि जावेद अख्तर. या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपटांचे लेखन केले आहे. अनेकांना या जोडीसोबत काम करायचे होते. मात्र, अभिनेते ऋषी कपूर यांनी या जोडीसोबत काम करण्यास नकार दिला होता. त्यांचा नकारानंतर जावेद अख्तर यांना राग अनावर झाला होता. त्यांनी थेट ऋषी कपूरला करिअर उद्धवस्त करण्याची धमकी दिली होती.
ऋषी कपूर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रदर्शित झाले होते. या पुस्तकाचे नाव 'खुल्लम खुल्ला' असे आहे. या पुस्तकात त्यांनी अनेक किस्से सांगितले आहेत. त्यामध्ये सलीम-जावेद यांच्या एका चित्रपटातील किस्सा देखील सांगितला आहे. सलीम-जावेद यांनी ऋषी कपूर यांना ‘त्रिशूल’ चित्रपटाची ऑफर दिली होती. पण ज्या पद्धतीने हे पात्र लिहीले गेले ते ऋषी कपूर यांना अजिबात आवडले नाही. यानंतर त्यांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिला. यामुळे सलीम खान त्यांच्यावर चांगलेच चिडले.
ऋषी कपूर हे पहिले अभिनेते होते ज्यांनी सलीम-जावेद यांच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. ऋषी कपूर यांनी केलेल्या उल्लेखानुसार सलीम खान म्हणाले होते की, ‘सलीम-जावेदचा चित्रपट नाकारण्याची तुझी हिंम्मत कशी झाली?’ त्यावर ऋषी कपूर यांनी उत्तर देत मला भूमिका आवडली नाही असे म्हटले होते. त्यावर लगेच सलीम खान म्हणाले की ‘तुला माहित आहे का? आजपर्यंत कोणीही आम्हाला नाही म्हटले आहे. आम्ही तुझे करिअर खराब करू शकतो.'
पुढे अमिताभ बच्चन यांचा उल्लेख करत सलीम जावेद म्हणाले की, “तुझ्याबरोबर कोण काम करेल? राजेश खन्ना यांना आम्ही ‘जंजीर’ ऑफर केली होती. पण त्यांनी नकार दिला होता हे तुला माहीत आहे. आम्ही काही केले नाही. आम्ही एक नवीन पर्याय शोधला. नंतर अमिताभ बच्चनने राजेश खन्नाचे करिअर उद्ध्वस्त केले. आम्ही तुझ्याबरोबरही असेच करू.”
वाचा: बॉलिवूडमधील सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा यूट्यूबवर प्रदर्शित! बजेट ४५ कोटी आणि कमाई ०.०१ कोटी
ऋषी कपूर यांनी सलीम-जावेदच्या धमक्यांकडे दुर्लक्ष केले. नंतर 'त्रिशूल' हा चित्रपट १९७८ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन, शशी कपूर, संजीव कुमार, राखी गुलजार, वहिदा रहमान, हेमा मालिनी, प्रेम चोप्रा, पूनम ढिल्लन आणि सचिन पिळगावकर हे कलाकार दिसले. या चित्रपटाचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केले.