Happy Birthday Saira Banu: आपल्या बहारदार अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री सायरा बानो आज (२३ ऑगस्ट) आपला ८०वा वाढदिवस साजरा करत आहेत. २३ ऑगस्ट १९४४ रोजी मसुरी येथे त्यांचा जन्म झालेला. सायरा यांनी आपल्या सौंदर्य आणि दमदार अभिनयामुळे हिंदी सिनेविश्वात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले होते. वयाच्या १७व्या वर्षी फिल्मी दुनियेत प्रवेश केलेल्या या अभिनेत्रीने जेव्हाही पडद्यावर एन्ट्री घेतली, तेव्हा प्रेक्षकांना वेड लावले. १९६१मध्ये शम्मी कपूरसोबत 'जंगली' चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या सायरा बानो यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
६०-७०च्या दशकातील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या सायरा बानो यांनी १९६६मध्ये दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्याशी लग्न केले. दिलीप कुमार यांच्याशी लग्न केल्यानंतर सायरा बानो यांनी फिल्मी जगताला अलविदा केला. मात्र, त्या आधी त्यांनी मोठ्या पडद्यावरही दिलीप कुमार यांची साथ दिली होती. त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत गाजवलेल्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊया...
रमेश तलवार यांच्या 'दुनिया' चित्रपटात दिलीप कुमार, अशोक कुमार आणि ऋषी कपूर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट मोहन कुमार नावाच्या माणसाभोवती फिरतो, जो आपली पत्नी आणि मुलगा गमावतो. यासोबतच तो त्याने न केलेल्या एका गुन्ह्यात अडकतो. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो बदला घेतो. सायरा बानो यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
‘गोपी’ या चित्रपटात सायरा बानो यांनी एका खेड्यातील मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये दिलीप कुमार नायकाच्या भूमिकेत होते. ए भीम सिंग दिग्दर्शित 'गोपी'मध्ये दिलीप कुमार यांनी एका साध्या आणि अडाणी माणसाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात प्राण सिकंद, जॉनी वॉकर आणि सुदेश कुमार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.
१९७०मध्ये बनलेल्या बंगाली चित्रपट 'सगीना महतो'चे दिग्दर्शक तपन सिन्हा होते. या चित्रपटात सायरा बानो-दिलीप कुमार यांची जोडी होती. १९४२-४३मधील कामगार चळवळीच्या सत्यकथेवर आधारित या चित्रपटाने चळवळीची माहिती दिली. सिलीगुडीच्या चहाच्या बागेत कामगार संघटनेची नेता असलेल्या सगीना महतो नावाच्या पात्राची ही कथा आहे.
असित सेन दिग्दर्शित 'बैराग' चित्रपटात दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाची कथा भोला नावाच्या नोकराची आहे, जो हरवलेल्या नवरदेवाच्या शोधात मुंबईच्या प्रवासाला निघतो. एका गुपितामुळे भोलाचे आयुष्य बदलते. या चित्रपटात लीना चंदावरकर, प्रेम चोप्रा, मदन पुरी आणि सुजित कुमार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते.