Saif Ali Khan Merry Christmas: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिचा आगामी चित्रपट 'मेरी ख्रिसमस' पुढील वर्षी १२ जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. या चित्रपटात कतरिना कैफसोबत साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण, या चित्रपटातील विजय सेतुपती याची भूमिका आधी सैफ अली खान याला करायची होती. मात्र, दिग्दर्शकाने त्याला ही भूमिका देण्यास नकार दिला होता.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'मेरी ख्रिसमस'चे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी खुलासा केला की, सैफ अली खान याला विजय सेतुपतीची भूमिका करायची होती. यावर दिग्दर्शक म्हणाले की, 'मला या चित्रपटासाठी खूप अनोख्या प्रकारची जोडी हवी होती, कारण ही कथेची गरज आहे. या दोन्ही व्यक्ती भिन्न दिसणाऱ्या आणि असणाऱ्याच हव्या होत्या. या दरम्यान मी एका अभिनेत्याला भेटलो, ज्याला ही भूमिका आवडली होती. पण, नंतर मलाच त्याला सॉरी म्हणावे लागले.'
या मुलाखतीत श्रीराम राघवन यांच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफही उपस्थित होती. यावेळी अभिनेत्रीने दिग्दर्शकाला चित्रपटात विजयची भूमिका साकारु इच्छिणाऱ्या अभिनेत्याचे नाव विचारले. यावर श्रीराम यांनी उत्तर दिले की, ‘हो, मी त्याचे नाव सांगू शकतो. तो सैफ अली खान होता! मी त्याला भेटलो आणि जेव्हा मी त्याला नाही म्हटले, तेव्हा तो खरोखर थोडा अस्वस्थ झाला होता. त्यावेळी मी विजयला कास्ट केले नव्हते. मी नकार दिला कारण मला काहीतरी नवीन हवे होते. त्यावेळी मलाच माहित नव्हते की मी काय शोधत होतो.’
श्रीरामने यापूर्वी सैफ अलीसोबत 'एक हसीना थी' आणि 'एजंट विनोद' या चित्रपटात काम केले आहे. श्रीरामने विजयला 'मेरी ख्रिसमस'साठी कसे कास्ट केले, याचा एक किस्सा देखील त्यांनी सांगितला. त्यांनी सांगितले की, ते एका फिल्म फेस्टिव्हलसाठी मेलबर्नला गेला होते. त्यावेळी तिथे '९६' पाहिल्यानंतर त्यांनी विजयची भेट घेतली आणि त्याला हिंदीत बोलता येते का असे विचारले. यावर विजयने होय असे उत्तर दिले आणि दिग्दर्शकाने त्याला 'मेरी ख्रिसमस'साठी लगेच निवडले.