Saif Ali Khan Hospitalized : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अभिनेत्याचे अधिकृत वक्तव्य समोर आले आहे. अभिनेता सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना धीर धरण्याची विनंती करतो. ही पोलिसांची बाब आहे. आम्ही तुम्हाला पुढील परिस्थितीची माहिती देत राहू, असे त्यांनी म्हटले आहे.
सैफच्या टीमने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 'सैफ अली खान यांच्या राहत्या घरी चोरीचा प्रयत्न झाला आहे. तो सध्या रुग्णालयात दाखल असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना थोडी काळजी घेण्याची विनंती करतो. धीर धरावा. हे एक पोलिस प्रकरण आहे. आम्ही परिस्थितीवर तुम्हाला अपडेट देत राहू.'
वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, सैफ अली खानच्या मुंबईतील निवासस्थानी मध्यरात्री एक अज्ञात व्यक्ती घुसला होता. त्या व्यक्तीचा सैफच्या घरातील मोलकरणीसोबत वाद सुरू झाला. जेव्हा सैफ तिथे पोहोचला आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा अज्ञात व्यक्तीसोबत त्याची देखील वादावादी सुरू झाली. यादरम्यान त्या व्यक्तीने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ आणि करीना यांच्या मोलकरणीला देखील दुखापत झाली आहे. या अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानवर चाकूने ६ वेळा वार केले. या हल्ल्यानंतर कुटुंबाला जाग येताच चोरट्याने घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस आता या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.
सैफ अली खान याच्या घरात हा हल्ला झाला, तेव्हा करीना कपूर खान तिची दोन मुले तैमूर आणि जेहसोबत घरीच उपस्थित होती. हल्ल्यात जखमी झालेल्या सैफला तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लीलावती रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानला पहाटे साडेतीन वाजता रुग्णालयात आणण्यात आले होते. त्याच्या शरीरावर सहा जखमा असून, त्यापैकी दोन गंभीर जखमा असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेत्याच्या मणक्याजवळ देखील दुखापत झाली आहे.
संबंधित बातम्या