Saif Ali Khan Injured In Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान रुग्णालयात दाखल आहे. मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील सैफ अली खानच्या घरात गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश केला. त्यांनी अभिनेत्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि नंतर तेथून पळ काढला. या हल्ल्यात सैफच्या मानेला, पाठीला, हाताला आणि डोक्याला जखमा झाल्याने सैफला पहाटे साडेतीन वाजता लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लीलावती हॉस्पिटलचे सीओओ डॉ. नीरज उत्मणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, शस्त्रक्रियेदरम्यान सैफच्या शरीरातून एक धारदार तुकडा सापडला होता. या तुकड्याची लांबी सुमारे २-३ इंच असल्याचे सांगितले जाते. सैफवर ज्या चाकूने हल्ला करण्यात आला होता, त्या चाकूचा हा तुकडा असल्याचे बोलले जात आहे.
लीलावती रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, सैफची एक जखम खूप खोल होती. तेथे १० टाके आहेत. चांगली गोष्ट म्हणजे त्याच्या पाठीच्या कण्यावर कोणताही परिणाम झालेला नाही किंवा चाकूच्या फटक्याने कोणत्याही महत्त्वाच्या अवयवावर कोणताही परिणाम झालेला नाही.
करीनाने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या घरी काल रात्री घरफोडीचा प्रयत्न झाला. सैफच्या हाताला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाकीचे कुटुंब ठीक आहे.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही अज्ञात व्यक्ती चोरीच्या उद्देशाने अभिनेत्याच्या घरात घुसली होती. हाणामारीत अज्ञात व्यक्तीने सैफवर चाकूने हल्ला केला. चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे की इतकी सुरक्षा असतानाही ही व्यक्ती सैफ अली खानच्या घरात कशी घुसली? दरम्यान, अभिनेत्याच्या सुरक्षा रक्षकाचे पहिले वक्तव्य समोर आले आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले आहे की, घटनेच्या वेळी तो झोपला होता. सैफ अली खानच्या वांद्रे येथील घराच्या इमारतीखाली ३ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. चौकशीत एका गार्डने सांगितले की त्याची सकाळची ड्युटी होती त्यामुळे तो झोपला होता. रात्री ड्युटीवर असलेल्या रक्षकांना विचारले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. साहजिकच ही घटना रात्री उशिरा घडली, त्यामुळे रात्रीच्या शिफ्टच्या गार्डवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या पोलिसांनी इमारतीतील सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
संबंधित बातम्या