मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. तिच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. सईची 'मिमी' या बॉलिवूड चित्रपटातील भूमिका विशेष गाजली होती. आता सई पुन्हा एकदा एका नव्या बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
सई ताम्हणकरच्या आगामी चित्रपटाचे नाव 'भक्षक' असे आहे. हा एक क्राइम ड्रामा आहे. तसेच सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टीझर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
वाचा: ही तर हद्दच झाली! अभिषेकच्या चेहऱ्यावर वॅक्स तर तोंडावर मिर्ची पावडर, पाहा व्हिडीओ
'भक्षक' या चित्रपटात एका अविचल स्त्रीच्या शोधाचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. या महिलेचा शोध ही एक पत्रकार महिला घेत असते. या पत्रकाराच्या भूमिकेत अभिनेत्री भूमी पेडणेकर दाखवली आहे. महिलांवरील गुन्ह्यांचे वास्तव समोर आणून एक अक्षम्य गुन्हा उघडकीस आणायचा तिचा प्रयत्न आहे. परंतु तिच्यावर आसपासची व्यवस्था आणि समाजाचा कसा दबाव असतो, याची कहाणी 'भक्षक'मधून बघायला मिळते. तसेच सई ही एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
'भक्षक' या चित्रपटात भूमी पेडणेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत संजय मिश्रा, आदित्य श्रीवास्तव, सई ताम्हणकर हे कलाकार दिसणार आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन पुलकित यांनी केले आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारी २०२४ रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.