Sadhi Mansa New Marathi Serial: मालिका विश्वात सध्या अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशीच एक नवी कोरी मालिका आता टीव्ही विश्वात दाखल होणार आहे. ‘साधी माणसं’ असं या मालिकेचं नाव असून, ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून दोन प्रसिद्ध चेहरे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘साधी माणसं’ या नावाप्रमाणेच या मालिकेचं कथानक देखील हटके असणार आहे. अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता आकाश नलावडे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
या जगात चांगली आपली सांगली असं आत्मविश्वासाने मिरवणाऱ्या सांगली शहरात ‘साधी माणसंट या मालिकेची गोष्ट घडते. मीरा आणि सत्या पा या गोष्टीतली दोन मुख्य पात्र आहेत. एकाच गावात रहात असलेल्या या दोन व्यक्तींचे स्वभाव मात्र टोकाचे आहेत. मीरा स्वभावाने अतिशय सकारात्मक, सहनशील आणि संपूर्ण कुटुंबाचा विचार करणारी मुलगी आहे. तर, घरची परिस्थिती बेताची असली, तरी हेही दिवस सरतील असा आत्मविश्वास तिने नेहमीच बाळगला आहे. मात्र, सत्या आणि नशिबाचा ३६चा आकडा आहे. डॉक्टर व्हायचं त्याचं स्वप्न होतं, पण आता तो गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम करत आहे. स्वत:च्या धुंदीत रहाणारा सत्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. अशा या दोन विभिन्न स्वभावाच्या मीरा आणि सत्यासोबत नियती आता कोणता खेळ खेळणार, याचीच गोष्ट ‘साधी माणसं’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिवानी बावकर आणि ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला पश्या म्हणजेच लोकप्रिय अभिनेता आकाश नलावडे हे कलाकार या मालिकेत ‘मीरा’ आणि ‘सत्या’ ही पात्र साकारणार आहेत. साध्या गोष्टी साधी माणसं नेहमी मनाला भिडतात. साधी माणसं मालिकेची गोष्ट देखील या नावाप्रमाणेच असणार आहे. साधं रहाणीमान, पण मोठी स्वप्न पूर्ण करताना समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला ते कसे न हरता सामोरं जातात आणि जगतात, हे या कथेतून उलगडणार आहे. अशा प्रेमळ माणसांची असामान्य गोष्ट साधी माणसं या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘साधी माणसं’ या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येताना माला खूप आनंद होतोय, अशा भावना अभिनेता आकाश नलावडे याने व्यक्त केल्या आहेत. आकाश नलावडे याने साकारलेल्या ‘पश्या’ या भूमिकेला खूप प्रेम मिळाले आहे. या भूमिकेने त्याला घराघरात पोहोचवले. या मालिकेतला त्याचा लूकही खूप वेगळा आहे. प्रेक्षक देखील या मालिकेसाठी आतुर झाले आहेत.
संबंधित बातम्या