Sadashiv Amrapurkar Birth Anniversary: आपल्या अभिनयाने मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपट सृष्टीही हादरवून सोडणारे खलनायक म्हणजे सदाशिव अमरापूरकर. चित्रपटसृष्टीतील सर्वात भयानक खलनायक अशी त्यांची प्रतिमाच निर्माण झाली होती. सदाशिव अमरापूरकर यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत एकापेक्षा एक खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत. ते ज्या चित्रपटात खलनायकाची भूमिका करायचे, त्या चित्रपटात ते नायकाच्या वाटणीचीही वाहवा मिळवून जायचे. पडद्यावर व्हिलन साकारणारे सदाशिव अमरापूरकर प्रत्यक्षात मात्र दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांचे सदाशिव अमरापूरकर यांच्याशी खास नाते होते.
ज्या काळात सदाशिव यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली, त्या वेळी धर्मेंद्र यांनी चित्रपटसृष्टीतील एक मोठा स्टार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली होती. मात्र, धर्मेंद्र सदाशिव अमरापूरकर यांना आपला लकी चार्म मानायचे. धर्मेंद्र यांना त्यांचा अभिनय इतका आवडला होता की, ते त्यांच्या प्रत्येक चित्रपटात सदाशिव यांना खलनायक म्हणून कास्ट करायचे. दोघांनी ‘एक फरिश्ते’, ‘हुकूमत’ आणि ‘ऐलान-ए-जंग’ यासह एकूण अकरा चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांचे हे सगळे चित्रपट सुपरडुपर हिट ठरले होते. सदाशिव चित्रपटात असतील तर चित्रपट गाजतात, अशी धर्मेंद्र यांची धारणा होती. म्हणूनच ते सदाशिव अमरापूरकर यांना ‘लकी चार्म’ मानायचे.
सदाशिव अमरापूरकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रकारच्या भूमिका केल्या. मात्र, त्यांना प्रसिद्धी फक्त खलनायकाच्या पात्रातूनच मिळाली. त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले. सदाशिव अमरापूरकर यांनी ‘अर्ध सत्य’, ‘मोहरा’, ‘हम साथ साथ है’, ‘हुकूमत’, ‘फरिश्ते’, ‘कुली नंबर १’ आणि ‘ऐलान-ए-जंग’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपले दमदार अभिनय कौशल्य दाखवले आहे.
चित्रपटसृष्टीतील या खतरनाक खलनायकाला आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात फुफ्फुसात संसर्ग झाला होता. याच आजारामुळे २०१४ साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, सदाशिव अमरापूरकर आपल्या दमदार भूमिकांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात सदैव अजरामर राहतील.
संबंधित बातम्या