सध्या देशभरात निवडणुकींचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रातही लोकसभा निवडणूक पार पडणार आहेत. नुकतीच निवडणुकांची घोषणा झाली असून, यंदाच्या निवडणुकांमध्ये अनेक कलाकार वेगवेगळ्या पक्षांकडून तिकीट मिळवून निवडणूक लढणार असल्याचे म्हटले जात आहे. या दरम्यान अनेक मराठी कलाकार निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याची देखील शक्यता आहे. काही राजकीय पक्षांनी सेलिब्रिटींना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर, काही कलाकार निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करून राजकीय कारकीर्द सुरू करताना दिसत आहेत. यातच आता ‘महागुरू’ म्हणजेच अभिनेते सचिन पिळगावकर हे देखील लोकसभा निवडणूक लढवणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
अशीच अनेक कलाकारांच्या नावांची चर्चा निवडणुकीच्या रिंगणात सध्या ऐकू येत आहे. सध्या भाजपकडून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत, अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. तर, शिंदे गटाच्या तिकिटावर अभिनेता गोविंदा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप त्यांनी तशी अधिकृत घोषणा केलेली नाही. तर, आता निवडणुकीच्या रिंगणात मराठी कलाकारांची नावही पुढे येत आहे. मराठी कलाकारही निवडणुकीत उतरणार का? राजकीय कार्यकर्त सुरू करणार का? असे प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले आहेत.
दरम्यान, आपण लोकसभा निवडणूक लढणार का? या प्रश्नावर स्वतः सचिन पिळगावकर यांनी उत्तर दिले आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार निवडण्यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून काही मराठी कलाकारांच्या नावाचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. यामध्ये अभिनेते शरद पोंक्षे, सचिन खेडेकर आणि सचिन पिळगावकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. ‘महागुरु’ निवडणूक लढवणार का आणि राजकीय पक्षाचा झेंडा हाती घेणार का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना देखील पडला होता. यावर आता स्वतः सचिन पिळगावकर यांनी उत्तर दिले आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सचिन पिळगावकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यावर भाष्य केले आहे. या पोस्टमध्ये सचिन पिळगावकर म्हणाले की, ‘मी लोकसभा निवडणुकीत उतरतोय ही अफवाह माझ्या कानावर ही आली, मी हसलो, एवढच सांगू शकतो की मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी फक्तं आहे माझ्या प्रेक्षकांचा... ६१ वर्ष आपला, सचिन पिळगांवकर’. महागुरूंच्या या पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमधून सचिन पिळगावकर यांनी निवडणुकीत उतरणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.