Happy Birthday Sachin Pilgaonkar: मराठी मनोरंजन विश्वाचे लाडके ‘महागुरू’ अर्थात अभिनेते सचिन पिळगावकर यांचा आज (१७ ऑगस्ट) वाढदिवस आहे. 'नदिया के पार' या चित्रपटातून सचिन पिळगावकर यांना खरी ओळख मिळाली होती. या चित्रपटात सचिन यांनी ‘चंदन’ या साध्याभोळ्या खेड्यातील मुलाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून त्यांनी लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते. सचिन पिळगावकर हे बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. आपल्या नैसर्गिक कलात्मकतेने त्यांनी लहान मुलांबरोबरच मोठ्यांच्याही हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे.
सचिन पिळगावकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५७ रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील शरद पिळगावकर हे देखील चित्रपट निर्माते होते. सचिन यांनी बालपणापासूनच अभिनयाला सुरुवात केली. अभिनयाचं बाळकडू त्यांना त्यांच्या घरातूनच मिळालं होतं. इतकंच नाही तर, सचिन पिळगावकर यांनी लहान वयातच राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. अवघ्या ५ वर्षांच्या सचिन यान डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित चाचा नेहरू यांनीही कुर्त्यातून लाल गुलाब काढून सचिन यांना देत कौतुकाची थाप दिली होती.
सचिन पिळगावकर यांचे संपूर्ण आयुष्य कॅमेऱ्यासमोर व्यतीत झालेय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण या अभिनेत्याने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी कारकिर्दीला सुरुवात केली. बालकलाकार म्हणून सचिन मराठी चित्रपटसृष्टीकडे वळले. राजा परांजपे यांच्या 'हा माझा मार्ग एकला' या मराठी चित्रपटात सचिन यांनी पहिल्यांदा काम केले. एवढेच नाही तर लहानपणी केलेल्या मराठी चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. बालकलाकार म्हणून सचिन यांनी जवळपास १५ चित्रपटांमध्ये काम केले होते.
‘हा माझा मार्ग एकला’ या मराठी चित्रपटासाठी सचिन पिळगावकर यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. बालपणी त्यांनी अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केले आणि त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यानंतर ते राजश्री प्रॉडक्शन हाऊसशी जोडले गेले. यादरम्यान त्यांना 'गीत गाता चल' मिळाला, ज्यामध्ये ते सारिकासोबत झळकले होते. त्यांचा हा चित्रपट यशस्वी ठरला आणि त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. त्यांचे ‘अशीही बनवा बनवी’, ‘गंमत जंमत’, ‘आत्या घरात घरोबा’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘एकापेक्षा एक’ असे अनेक चित्रपट तुफान गाजले.
सचिन पिळगावकर यांनीही टीव्हीवर भरपूर काम केले आहे. त्यांनी लोकप्रिय टीव्ही कॉमेडी शो 'तू तू मैं मैं' दिग्दर्शित केला होता, ज्यामध्ये त्यांची पत्नी सुप्रिया आणि अभिनेत्री रीमा दिसल्या होत्या. हा कार्यक्रम टीव्हीवर खूप लोकप्रिय झाला. याशिवाय त्यांनी दारा सिंह यांच्या 'हद कर दी' या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. अभिनय आणि दिग्दर्शनासोबतच सचिन उत्तम नृत्यही करतात. २००६मध्ये त्यांना 'नच बलिये १'चे विजेतेपद मिळाले होते.