'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत निशी आपल्या नवीन आयुष्यात रमायचा प्रयत्न करतेय. नुकतंच ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेत निशी आणि नीरज यांचा लग्न सोहळा पाहायला मिळाला होता. या शाही लग्न सोहळ्यात अनेक अडचणी देखील आल्या होत्या. नीरज आणि निशी यांचं एकमेकांवर मनापासून प्रेम होतं. मात्र, या दोघांच्या नात्याला दोन्ही घरातून विरोध होता. परंतु, निशी आणि नीरज यांच्या प्रेमापुढे सगळ्यांनीच हार मानली. दोन्ही घरातून या लग्नासाठी परवानगी मिळाली. असं असलं तरी नीरजच्या आईने म्हणजेच मेघनाने निशीला कधीच सून म्हणून स्वीकारायचं नाही, असा निर्णय घेतला आहे.
निशी आणि नीरज लग्न करून आता त्यांच्या घरी आले आहेत. हे लग्न पार पडेस्तोवर मेघनाने सगळ्यांशी गोड वागण्याचा प्रयत्न केला. पण, आता मेघनाच्या चांगुलपणाचा रंग उतरायला सुरुवात झाली आहे. तिने स्वतःशी गाठ बांधली आहे की, निशीने काहीही केले तरी आपण तिला मनापासून कधीच सून म्हणून स्विकारायचं नाही. मेघनाने फक्त नीराजच्या हट्टापायी हे लग्न करून दिले आहे. मुंबईला जाण्याआधी ही मेघनाने निशीचा काटा काढण्याची पूर्ण तयारी केली होती. पण, आयत्यावेळी ओवी आल्यामुळे तिचा प्लान फसला होता.
निशी लग्न होऊन सासरी जाण्यापूर्वी ओवी आणि सगळ्या मैत्रिणींनी मिळून एक छोटेखानी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत जात असताना निशी आणि ओवी यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केला होता. यावेळी गुंडांनी निशीचे मंगळसूत्र आणि गळ्यातील काही दागिने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान गुंडांनी निशीला जीवे मारण्याचा प्रयत्न करत हल्ला देखील केला. मात्र, ओवीने मधे पडत या गुंडांशी दोन हात केले होते. ओवीने या गुंडांना चांगलाच धडा शिकवला होता. मात्र, या हाणामारीत ओवी गंभीर जखमी झाली होती. आपल्या बहिणीचा म्हणजेच निशीचा जीव वाचवण्यासाठी ओवीने स्वतःचा जीव धोक्यात घातला होता.
खरंतर निशीला जिवे मारण्याचा हा प्लॅन नीरजच्या आईने म्हणजे मेघनानेच केला होता. मात्र, ओवीच्या धाडसीपणामुळे मेघनाचा हा प्लॅन चांगलाच फसला. पण, आता ती हे अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करणार आहे. नीरज परत येईपर्यंत ती निशीला घरातून आणि नीरजच्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. याची सुरुवात मेघनाने अतिशय हुशारीने केली आहे. मेघना, निशीला नीरजच्या आयुष्यातून बाहेर काढण्यात यशस्वी होईल का? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.