S. P. Balasubrahmanyam : ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदवणारे एस. पी. बालासुब्रमण्यम! वाचा…
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  S. P. Balasubrahmanyam : ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदवणारे एस. पी. बालासुब्रमण्यम! वाचा…

S. P. Balasubrahmanyam : ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदवणारे एस. पी. बालासुब्रमण्यम! वाचा…

Published Jun 04, 2023 08:11 AM IST

S. P. Balasubrahmanyam Birth Anniversary: एस. पी. बालासुब्रमण्यम यांना ‘दक्षिणेतील रफी’ म्हणून नावाजले जाते. देशातील तिसरा सर्वोच्च पुरस्कार अर्थात ‘पद्मभूषण’ पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे.

S. P. Balasubrahmanyam
S. P. Balasubrahmanyam

S. P. Balasubrahmanyam Birth Anniversary: कमल हसनच्या ‘एक दुजे के लिये’ या चित्रपटाने गायक-संगीतकार एस. पी. बालासुब्रमण्यम यांना हिंदी चित्रपटसृष्टीत हक्काचे स्थान मिळवून दिले. एस.पींच्या आवाजातले ‘हम बने तुम बने एक दुजे के लिये’ हे गाणे त्याकाळी प्रचंड गाजले. याशिवाय सलमान खान पहिला चित्रपट ‘मैने प्यार किया’साठी त्यांनी सलमानचा आवाज बनून गाणी गायली. ४ जून १९४६ रोजी आंध्र प्रदेशातल्या, नेल्लोर येथील मूलपेट मेहुआमध्ये एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हरिकथा कलाकार होते. हरिकथा हा आंध्र प्रदेशातील एक पारंपरिक कला प्रकार असून, यात कथा, कविता, नृत्य, नाटक अशा सगळ्या कला यात अंतर्भूत असतात. धार्मिक कथा या कलाप्रकारातून सादर केल्या जातात. एस. पी. बालासुब्रमण्यम यांचे वडील याच नाटकांतून काम करायचे. एस. पी. बालासुब्रमण्यम यांना दोन भाऊ आणि पाच बहिणी असून, त्यातील एक बहिण एस.पी.शैलजा यासुद्धा गायिका आहेत.

एस. पी. बालासुब्रमण्यम यांना अभियंता बनायचे होते, ते त्यांचे स्वप्न होते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आंध्रप्रदेशच्या अनंतपुर येथील जवाहरलाल टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटीमध्ये प्रवेश देखील घेतला होता. मात्र, याच कालावधीत ते प्रचंड आजारी पडले. आजार तसा गंभीर नव्हता. परंतु त्यातून बरे होण्यासाठी त्यांना खूप कालावधी गेला. याचमुळे त्यांना इंजिनिअरिंग सोडावी लागली. इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यापूर्वी आणि इतर अभ्यासक्रम शिकत असताना त्यांचे संगीत शिक्षण मात्र नित्य नियमाने सुरु होते. १९६४मध्ये त्यांना ‘हौशी’ गायक म्हणून त्यांना एका स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले होते. यानंतर गायन क्षेत्रात करिअर करायचे असे ठरवून ते पुढे जात राहिले.

Ashok Saraf Birthday: बँकेची नोकरी ते अभिनय क्षेत्र; असा सुरू झालेला अशोक सराफ यांचा फिल्मी प्रवास!

सुरुवातीला त्यांनी अनेक मोठ्या दक्षिणात्य संगीतकार आणि गायकांसोबत सहायक काम करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्यांनी आपल्या गायकी कलेला एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न केला. याचाच परिणाम म्हणजे त्यांना पुढच्या दोन वर्षात, १९६९ साली म्हणजेच वयाच्या २० व्या वर्षी स्वतंत्र्यपणे गाण्याची संधी मिळाली. त्यांचे पहिले गाणे हे त्यांच्या मातृभाषेत अर्थात तेलुगुत होते. या गाण्याच्या अगदी आठ दिवसांनी त्यांनी कन्नड भाषेतील एक गाणे रेकॉर्ड केले. एस. पी. बालासुब्रमण्यम यांना ‘दक्षिणेतील रफी’ म्हणून नावाजले जाते. देशातील तिसरा सर्वोच्च पुरस्कार अर्थात ‘पद्मभूषण’ पुरस्काराने एस. पी. बालासुब्रमण्यम यांना गौरवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी सहा राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्यांना प्रसिद्धी मिळाली. याच दरम्यान तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक बालचंदर एका हिंदी चित्रपटावर काम करत होते. या चित्रपटासाठी त्यांनी एस. पी. बालासुब्रमण्यम यांची निवड केली. चित्रपट होता ‘एक दुजे के लिये’. विशेष म्हणजे हा चित्रपट कमल हसन, रति अग्निहोत्री, एस. पी. बालासुब्रमण्यम या तीनही कलाकारांचा पहिला हिंदी चित्रपट होता. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी चित्रपटाचे संगीत तयार केले होते. मात्र, दाक्षिणात्य आवाज या चित्रपटासाठी वापरावा यावर त्यांचे दुमत होते. परंतु, एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्या आवाजाने ते इतके भारावून गेले की, त्यांनी गायक म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. प्रदर्शनानंतर चित्रपट आणि गाणी दोन्हींना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या चित्रपटाची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. ‘एक दुजे के लिये’ या पहिल्याच हिंदी चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

८ फेब्रुवारी, १९८१ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ अशा बारा तासांत तब्बल २१ कन्नड गाणी रेकॉर्ड करत त्यांनी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपले नाव कोरले. या आधी त्यांनी एका दिवसांत १९ तमिळ गाणी तर, १६ हिंदी गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम केला होता. ते इतके व्यस्त होते की, दिवसाला १५-१६ गाणी ते रेकॉर्ड करतच! याशिवाय ते मोठ्या कलाकारांसाठी डबिंगही करत.

Whats_app_banner