Rohit Raut Nakhrewali Song: प्रत्येकाच्या आयुष्यात एक नखरेवाली किंवा एखादा नखरेवाला व्यक्ती असतोच. याच नखरेवालीचा खट्याळ अंदाज रोहित राऊत आपल्या गाण्यातून सगळ्यांना सांगणार आहे. गायक रोहित राऊत आणि संगीतकार प्रशांत नाकती यांच्या गावरान मराठमोळ्या‘नखरेवाली’ या गाण्याने आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. अल्पावधीतच या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या गाण्यात ‘जाऊ बाई गावात’ या शोची फायनलिस्ट अंकिता मेस्त्री झळकली आहे.
‘नखरेवाली’ या गाण्याच्या हूकस्टेप अगदी मनात बसणाऱ्या आहेत. शिवाय हे गाण ऐकल्यावर पाय आपोआप थिरकायला देखील लागतात. या गाण्यात निक शिंदे, रितेश कांबळे, अनुश्री माने आणि ‘जाऊ बाई गावात’ या मराठी रिऍलिटी शोची फायनलिस्ट अंकिता मेस्त्री यांच्या मुख्य भूमिका आहेत. गायक रोहित राऊतसोबत गायिका सोनाली सोनवणे हिने गाण्याला स्वरसाज दिला आहे. या गाण्याच संगीत प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी केलं आहे. या गाण्याच दिग्दर्शन रोहित जाधव याने केलं असून, या गाण्याचं छायाचित्रीकरण सुरज राजपुत याने केलं आहे. अभिनेता विशाल निकम, गायक रोहित राऊत, गायिका जुईली जोगळेकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे खासगी सचिव अविनाश सोलवट आणि अन्य कलाकार यांच्या प्रमुख उपस्थितीत या गाण्याचा प्रीमियर सोहळा नुकताच पार पडला.
गायक रोहित राऊत‘नखरेवाली’ गाण्याविषयी बोलताना म्हणाला की,‘जेव्हा प्रशांत सरांचा मला कॉल आला तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण मराठी म्युझिक अल्बम इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात टॉपची गाणी प्रशांत सरांची असतात. आणि त्यांच्यासोबत माझं हे पहिलच गाणं आहे. हे गाण रेकॉर्ड करतानाही मला खूप मज्जा आली. हे गाणं खूप एनर्जेटिक झालं आहे, त्यामुळे प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच आवडेल.’
रोहित राऊतचं ‘नखरेवाली’ हे गावरान मराठमोळ असं भन्नाट गाणं एका लव्हस्टोरीवर आधारित आहे. मुलींचा निरागस आणि सोज्वळ नखरा टिपणारं असं हे गाणं आहे. या गाण्याचं चित्रीकरण नाशिकच्या एका सुंदर गावात झालेलं आहे. आजचा काळ मॉडर्न झाला आहे, पण गावाकडचं निरागस प्रेम वेगळ्या रीतीने मांडण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे. गाण्यातील चारही कलाकार उत्तम डान्सर आहेत.
संबंधित बातम्या