मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी चोरी झाली आहे. चोराने घरातील ६ लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरण नेहा आणि तिचा पती शार्दुल सिंग बायसने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ही चोरी नेहाच्या वांद्रे येथील घरात झाली आहे.
नेहा पेंडसे ही वांद्रे येथील अरेटो बिल्डींगमध्ये २३व्या मजल्यावर राहाते. २८ डिसेंबर रोजी तिच्या घरात चोरी झाली. चोराने नेहा आणि शार्दुलला लग्नात मिळालेले सोन्याचे ब्रेसलेट आणि हिऱ्याची अंगठी चोरली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शार्दुल अनेकदा बाहेर जाताना या गोष्टी वापरतो. २८ डिसेंबर रोजी घरी परतल्यावर त्याने घरातील मदतनीस सुमित कुमार सोलंकीकडे ते सोपावले होते. त्याने ते बेडरुमच्या कपाटात ठेवले होते.
वाचा: 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये शालिनी शिर्के-पाटीलची धमाकेदार एण्ट्री, मालिकेत नवे वळण
सुमित सोलंकीसह घरातील इतर मदतनीस घरातच राहतात. घटनेच्या दिवशी बायस बाहेर जाण्याच्या तयारीत असताना ते कपाटात दागिने शोधत होते. परंतु, त्यांना दागिने सापडले नाहीत. त्यामुळे त्यांनी घरातील सर्व लोकांकडे चौकशी केली. परंतु, कोणालाच दागिन्यांविषयी माहिती नव्हती. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे शार्दुलच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने सोलंकीशी संपर्क साधला. परंतु तेव्हा तो कुलाबा येथे मावशीच्या घरी असल्याचे त्याने सांगितले. त्याला दागिन्यांविषयी विचारले असता सोलंकी याने दागिने नेहमी ठेवले जातात तिथेच ठेवले असल्याचे सांगितले. मात्र, शार्दुसलने शोधाशोध केली असता दागिने कुठेच सापडले नाहीत.
शार्दुलचा सोलंकीवरचा संशय वाढला. त्याला तातडीने घरी बोलावून घेतले. मात्र, घरी येण्यास उशिर होईल असे तो म्हणला. त्यामुळे त्याच्यावरचा संशय आणखी वाढला. परिणामी बायसचा ड्रायव्हर झा याने वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल करून सोलंकीवर संशय व्यक्त केला. याप्रकरणी पोलिसांनी सोलंकी याला अटक केली असली तरी चोरीचे दागिने अद्याप मिळालेले नाहीत.