नुकताच एका व्यक्तीने बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत, असा दावा केला होता की, रवीना टंडनने नशेत एका वृद्ध व्यक्तीला तिच्या कारने धडक दिली होती आणि चौकशी केली असता त्या वृद्ध महिलेला मारहाण केली होती. मात्र, या प्रकरणाचा तपास केल्यानंतर अभिनेत्री मद्यधुंद अवस्थेत असणे, बेदरकारपणे वाहन चालविणे आणि वृद्ध महिलेला मारहाण करणे, हे आरोप खोटे असल्याचे मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आले आहेत. आता अभिनेत्रीने व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली आहे.
अभिनेत्री रवीना टंडन हिने या रोडरेज प्रकरणी पोस्ट केलेला व्हिडीओ न हटवल्याबद्दल मानहानीची तक्रार दाखल केली असून, सदर व्यक्तीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. १२ जून रोजी मानहानीची नोटीस पाठवण्यात आली होती. रवीना टंडनची वकील सना खान यांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’ला सांगितले की, नुकत्याच घडलेल्या या सगळ्या प्रकरणात केवळ रवीना टंडन हिला खोट्या आरोपात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
रवीना टंडनवरील आरोप खोटे असल्याचे पोलीस तपास आणि सीसीटीव्हीवरून स्पष्ट झाल्याने अभिनेत्रीने इन्टरनेटवरील सदरचे व्हिडीओ हटवण्याची मागणी केली होती. रवीना टंडनच्या वतीने ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ पोस्ट केला, त्याला तो व्हिडीओ काढून टाकण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्या व्यक्तीने व्हिडीओ हटवण्यास नकार दिल्यानंतर अभिनेत्रीने त्या व्यक्तीला मानहानीची नोटीस पाठवली.
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिची प्रतिमा मलीन करण्यासाठी जाणीवपूर्वक ही खोटी बातमी पसरवली जात असल्याचे, तिच्या वकील सना खान यांनी म्हटले आहे. या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी आम्ही आवश्यक ती कायदेशीर पावले उचलत आहोत, असेही यावेळी त्यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये या व्यक्तीने दावा केला होता की, रात्रीच्या वेळी रस्त्यावर चालत असताना त्याच्या आईला रवीना टंडनच्या कारने धडक दिली आणि चौकशी केली असता या प्रकरणात बाचाबाची झाली आणि अभिनेत्रीने आपल्या आईला मारहाण केली. त्याची आई, बहीण आणि भाची घराजवळ चालत असताना ही घटना घडल्याचा दावाही या व्यक्तीने केला होता. मात्र, अभिनेत्रीवरील हे सर्व आरोप खोटे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहेत. त्यानंतर आता अभिनेत्री रवीना टंडन हिने या व्यक्तीविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.
संबंधित बातम्या