RJ Simran Death : 'जम्मू की धडकन' या नावाने प्रसिद्ध असलेल्या रेडिओ जॉकी (आरजे) आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सिमरन सिंग हिच्या निधनाने तिच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला आहे. गुरुग्राममधील सेक्टर ४७ मधील फ्लॅटमध्ये २६ वर्षीय आरजे सिमरनचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मित्राने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे मानले जात आहे. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.
मात्र, इतरांना इतके हसवणारी चुलबुली मुलगी असे पाऊल उचलू शकते यावर सिमरनच्या चाहत्यांचा विश्वास बसत नाहीये. सिमरनच्या निधनाची बातमी येताच तिचे फॉलोअर्स आणि चाहते मोठ्या संख्येने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोहोचले आहेत. आरजे सिमरनने १३ डिसेंबर रोजी इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट केली होती. ज्यामध्ये ते समुद्रकिनाऱ्यावर मोकळेपणाने डान्स करताना दिसली आहे. समुद्रकिनाऱ्यावर अशा प्रकारे जीवनाचा आनंद घेत असणारी ही मुलगी अवघ्या १३ दिवसांनंतर आपले जीवन संपवू शकते, यावर कुणाचाच विश्वास बसंत नाहीये.
सिमरनच्या शेवटच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी सिमरनने आत्महत्या केली नसून, तिची हत्या झाली असावी, अशी भीती व्यक्त केली आहे. सुमित नावाच्या एका युजरने लिहिले की, ‘मलाही वाटते की तिने आत्महत्या केली नसेल. ही हत्या आहे. आत्महत्येमागे काहीच कारण नाही. अशी कणखर, सुंदर, आत्मविश्वासी, तरुण आणि यशस्वी मुलगी अचानक काहीही न बोलता, काहीही न सांगता, व्हिडिओ न बनवता, कोणतीही चिठ्ठी न सोडता आत्महत्या कशी करेल? ती प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ बनवत असते, ती प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत असते. तर, तिला काही त्रास असता, मानसिक आरोग्याविषयी काही समस्या असत्य, तर यावर ती कधीच काही बोलली नसती का? आणि जेव्हा मानसिक आरोग्य इतकं बिघडलं असतं, तेव्हा तिने खराब मानसिक आरोग्यावरचा लेटेस्ट व्हिडिओ पोस्ट केला असता का? जर तिने १ महिन्यापूर्वी व्हिडिओ पोस्ट करणे बंद केले असते, तर ते समजण्यासारखे तरी होते.’
याच पोस्टवर वैष्णव नावाच्या युजरने लिहिले की, ‘हे मर्डर केस आहे. ती तसे करूच शकत नाही.’ आणखी एकाने लिहिले की, "ही हत्या आहे. कारण, जर ती तणावाखाली असती किंवा तिला काही मानसिक समस्या असती, तर तिने रील्स बनवले नसते किंवा काहीही पोस्ट केल्या नसत्या. ती पूर्णपणे ठीक होती हे रीलवरून स्पष्ट होते. जर कोणी नैराश्यग्रस्त असेल, तर तो एकांतात जातो. ही हत्या आहे, आत्महत्या नाही.' त्याचबरोबर हसतमुख चेहऱ्यामागे अनेकदा खूप दु:ख असतं, असंही काहींनी म्हटलं आहे.
गुरुग्राम पोलीस सिमरन सिंगच्या मृत्यूच्या कारणांचा तपास करत आहेत. प्राथमिक तपासात पोलिस हे आत्महत्येचे प्रकरण मानत आहेत. सिमरनच्या मित्रांची पोलीस चौकशी करणार आहेत. सिमरनच्या फोनचीही तपासणी केली जात आहे. सिमरन सिंग सेक्टर-४७ मध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये मित्रांसोबत राहत होती. सध्या ती मॉडेलिंग करत होती आणि इन्स्टाग्रामवर खूप व्हिडिओ बनवत होती.
संबंधित बातम्या