Riteish Deshmukh Life Facts : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा आज (१७ डिसेंबर) त्याचा ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने आपल्या विनोदी अंदाजाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. गेल्या दोन दशकांपासून रितेश मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. रितेशने मनोरंजन विश्वात सक्रिय असला, तरी तो पेशाने आधी आर्किटेक्ट होता. मात्र, त्याने आपल्या कारकिर्दीत वेगळा मार्ग निवडला. आजही तो आर्किटेक्ट आहे आणि स्वतःची इंटिरिअर डिझायनिंग कंपनीही चालवतो. पण, यानंतरही त्याने चित्रपटांमध्ये आपलं स्थान पटकावलं आहे.
रितेश देशमुखचा जन्म १७ डिसेंबर १९७८ रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. क्रिकेटची आवड असलेल्या रितेशने कमला रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले आहे. तो डिझायनर बनला होता आणि परदेशात आर्किटेक्ट म्हणून काम करत होता. पण परदेशात काम करणारा हा वास्तुविशारद भारतातील सर्वात सक्षम अभिनेत्यांपैकी एक होईल, असे कुणालाही वाटले नसेल.
रितेश देशमुखला अभिनयाची आवड होती. आर्किटेक्चरच्या शिक्षणासोबतच त्याने परदेशात अभिनयाचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. एकदा तो चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासोबत शूटिंग सेटवर गेला होता. तिथे त्यांची भेट सिनेमॅटोग्राफर कबीर लाल यांच्याशी झाली. त्याने रितेशला पाहिले आणि त्याला चित्रपटाची ऑफर दिली. 'तुझे मेरी कसम' असे या चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटातूनच रितेशने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. याशिवाय या चित्रपटात त्याच्या विरुद्ध जेनेलिया डिसूजा होती, जी नंतर रितेशची पत्नी देखील बनली.
रितेशने त्याच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. जेव्हा निर्मात्यांनी त्याच्याकडून विनोदी भूमिका करून हव्या होत्या, तेव्हा त्याने त्या केल्या. तर, जेव्हा त्याने नकारात्मक भूमिका कराव्यात असे, वाटले तेव्हा त्याने तेही केले. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, रितेश देशमुखने आपल्या २१ वर्षांच्या करिअरमध्ये फक्त एकच हिंदी सुपरहिट चित्रपट दिला आहे. तो म्हणजे 'ग्रँड मस्ती' जो एक मल्टीस्टारर चित्रपट होता.
या अभिनेत्याने आजवर ११ हिट चित्रपटही दिले आहेत. पण, हा आकडा त्याच्या फ्लॉप चित्रपटांपेक्षा खूपच कमी आहे. रितेशने त्याच्या करिअरमध्ये एकूण १९ फ्लॉप चित्रपट दिले आहेत. आता त्याने 'वेड' चित्रपटानंतर करिअरची दुसरी इनिंग सुरू केली आहे. आता तो दिग्दर्शकही झाला आहे. त्याच्या 'वेड' या चित्रपटाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
संबंधित बातम्या