Raja Shivaji Marathi Movie: छत्रपती शिवाजी महाराज यांची आज (१९ फेब्रुवारी) ३९४वी जयंती आहे. यानिमित्ताने सगळेच महाराजांच्या इतिहासाला उजळणी देत आहे. याच खास दिनाचं निमित्त साधून आता महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख याने मोठी घोषणा केली आहे. नुकतीच त्याने एक पोस्ट शेअर करून त्याच्या आगामी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. रितेश देशमुख याचा हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासावर आधारित असणार आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर त्याने नुकतंच शेअर केलं आहे.
रितेश देशमुख याने त्याच्या आगामी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जीचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं. छत्रपती शिवाजी महाराज.. फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तिनशे वर्षांपासून.. प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे. शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला. एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं …आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे….’राजा शिवाजी’’.
गेल्या काही दिवसांपासून रितेश देशमुख मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज साकारणार असल्याचे चर्चेत होते. अखेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची घोषणा करून त्याने चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. रितेश देशमुख याने शेअर केलेल्या या पोस्टरवर स्वतः रितेश महाराजांच्या भूमिकेत दिसला आहे. त्याच्या चित्रपटाच्या या पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
रितेश देशमुख ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. तर, जिनिलीया देशमुख आणि ज्योती देशपांडे या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. जिओ स्टुडीओ आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती मुंबई फिल्म कंपनी या बॅनर अंतर्गत केली जात आहे. रितेश देशमुख याच्या या पोस्टवर आता चाहते आणि कलाकार भरभरून कमेंट्स करत आहेत.