Riteish And Genelia Deshmukh Viral Video: बॉलिवूडच नव्हे तर, मराठी मनोरंजन विश्वात देखील अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसुझा-देशमुख या जोडीला आदर्श जोडी मानले जाते. रितेश आणि जिनिलिया नेहमीच चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर देखील त्यांच्यातील प्रेम अगदी नव्यासारखं टिकून आहे. याची प्रचिती पावलो पावली येत असते. आता देखील त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघांनी पुन्हा एकदा एकमेकांचं प्रेमाने कौतुक केलं आहे. इतकंच नाही, तर शेकडो लोकांसमोर रितेशने जिनिलियाला मिठी मारली. दोघांचा हा व्हिडीओ पाहून आता नेटकरी देखील कौतुक करत आहेत.
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा हा व्हिडीओ नुकत्याच पार पडलेल्या ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्यातील आहे. ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? २०२३’ या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता रितेश देशमुख याने ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ हा पुरस्कार पटकावला आहे. त्याला हा पुरस्कार जाहीर होताच जिनिलिया आणि रितेश यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. यावेळी पुरस्कार स्वीकारताना रितेशने पत्नी जिनिलियाचे तोंडभरून कौतुक केले. ‘दिग्दर्शक म्हणून आपल्यावर विश्वास ठेवणारी पहिली व्यक्ती ही माझी पत्नी जिनिलिया देशमुख होती. त्यामुळे हा पुरस्कार तिच्यसाठी आहे’, असे रितेश देशमुख याने म्हटले. तर, पुरस्कार स्वीकारून खाली येताच त्याने सर्वांसमोर पत्नी जिनिलियाला मिठी मारली आणि कीस केलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत. रितेश देशमुखने आपल्या पत्नीला दिलेला हा मान पाहून सगळेच त्याचं कौतुक करत आहेत. तर, जिनिलियाने रितेशला त्याच्या प्रत्येक पावलावर दिलेली साथ ऐकून आता चाहते तिचे देखील खूप कौतुक करत आहेत. रितेश आणि जिनिलिया नेहमीच त्यांच्या चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. त्यांच्यातील प्रेम पाहून नेटकरी देखील भारावून जातात. दोघेही नेहमीच एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसतात.
‘झी टॉकीज’ वाहिनीच्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या पुरस्कार सोहळ्याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. रविवार, १८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे. चित्रपटाशी निगडित पडद्यावरचे आणि पडद्यामागचे कलाकार यांच्या या शर्यतीत प्रेक्षकांच्या पसंतीतून 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' ठरवले जात असल्याने या पुरस्काराची विशेष चर्चा रंगली आहे.