बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर आता या जगात नाहीत, पण त्यांचे कुटुंब आणि चाहत्यांनी नेहमीच त्यांना आपल्या आठवणींमध्ये जिवंत ठेवले आहे. ऋषी कपूर यांचे कुटुंबीय अनेकदा त्यांच्याबद्दल काही ना काही शेअर करत असते. आपल्या आवडत्या अभिनेत्याबद्दल न ऐकलेल्या गोष्टी ऐकून चाहतेही खूश होतात. ऋषी कपूर यांनी ३० एप्रिल २०२० रोजी या जगाचा निरोप घेतला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ऋषी कपूर हे बऱ्याच दिवसांपासून आजाराने त्रस्त होते. उपचारांदरम्यानच त्यांचे निधन झाले होते. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर अनेकदा त्यांच्याबद्दल बोलताना दिसतात. एकदा एका रिॲलिटी शोमध्ये नीतू कपूरने ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा सांगितली होती. त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली. चला तर, जाणून घेऊया ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा काय होती...
अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर पुन्हा एकदा कामावर परतल्या. सुरुवातीला त्यांनी एका डान्स रिॲलिटी शोला जज केले, ज्यामध्ये त्यांना खूप पसंती मिळाली. नीतू कपूर यांनी ‘डान्स दिवाने ज्युनियर’ या शोच्या परीक्षक पदाची धुरा संभाळली. या शोच्या एका एपिसोडमध्ये त्यांनी ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा सांगितली होती. या शोमध्ये ऋषी कपूर यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगताना नीतू सिंह-कपूर म्हणाल्या की, ऋषीजींची शेवटची इच्छा होती की, त्यांच्या डोळ्या देखत मुलाचे म्हणजे रणबीरचे लग्न व्हावे. मात्र, त्यांची शेवटची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. त्यांची एक इच्छा तर पूर्ण झाली की, त्यांच्या मुलाने लग्न केले. आम्हाला माहित आहे, ऋषीजी आता जिथे कुठे असतील, तिथून ते खुश होत असतील.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे लग्न १४ एप्रिल २०२२ रोजी झाले होते. रणबीर आणि आलियाचे लग्न त्यांच्या घरीच पार पडले. यामध्ये त्यांच्या कुटुंबीय आणि काही खास मित्रांनी सहभाग घेतला होता. रणबीर आणि आलियाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता हे दाम्पत्य एका मुलीचे पालक झाले आहे. रणबीर आणि आलियाच्या मुलीचे नाव राहा आहे.
काही दिवसांपूर्वी राहासोबतचा ऋषी कपूर यांचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये राहा तिचे आजोबा ऋषी कपूर यांच्यासोबत दिसली होती. हा फोटो पाहून कपूर कुटुंब भावूक झाले होते. नीतू कपूर आणि सोनी राजदान यांनीही हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
संबंधित बातम्या