दिग्दर्शक संदीप सिंग यांच्या 'छत्रपती शिवाजी महाराज' या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटात 'कांतारा' सिनेमातील अभिनेता ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. हा लूक पाहून चाहते चकीत झाले. आता ऋषभने एका मुलाखतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यावर आनंद व्यक्त केला आहे. चला जाणून घेऊया ऋषभ काय म्हणाला.
ऋषभने नुकतीच 'टाइम्स ऑफ इंडिया'ला मुलाखत दिली. अभिनेत्याने या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारणे हा 'सन्मान' असल्याचे सांगितले आहे. तसेच भूमिका पडद्यावर साकारणे अभिमानास्पद आहे असे देखील तो म्हणाला आहे. 'शिवरायांच्या जीवनाने नेहमीच भुरळ घातली आहे आणि या बायोपिकसारख्या संधी कलाकारांना क्वचितच मिळतात. शिवरायांचे जीवन आणि वारसा मला नेहमीच भुरळ घालत आला असून अशा महान ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाशी जोडले गेल्याचा अभिमान वाटतो. बायोपिकसारख्या संधी आयुष्यात एकदाच येतात. एक अभिनेता आणि कलाकार म्हणून त्यांची कहाणी मोठ्या पडद्यावर जिवंत करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे' असे ऋषभ म्हणाला.
या चित्रपटासाठी दिग्दर्शकाची दृष्टी इतकी 'भव्य' होती की, त्याला या प्रकल्पासाठी होकार द्यायला वेळ लागला नाही, असे अभिनेत्याने सांगितले. 'संदीपची या चित्रपटाविषयीची दृष्टी इतकी भव्य होती, की चित्रपटची कथा ऐकताच मी होकार दिला. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमहत्त्वाचा प्रभाव हा इतिहासाच्या पलीकडे आहे आणि त्याची कथा पडद्यावर आणताना मला खूप अभिमान वाटतो. भरपूर ड्रामा, भव्यता आणि भावनांनी भरलेला चित्रपट लोकांसोबत शेअर करण्यासाठी उत्सुक आहे', असे ऋषभने सांगितले.
वाचा: रवींद्र महाजनींच्या पत्नीच्या मदतीला धावून आले होते बाळासाहेब ठाकरे, वाचा नेमकं काय झालं होतं?
काही दिवसांपूर्वी ऋषभने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर त्याच्या आगामी 'छत्रपती शिवाजी महाराज' चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर शेअर केले होते. हा चित्रपट जानेवारी २०२७ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचेही त्याने सांगितले. हे पोस्टर शेअर करत त्याने, "भारतातील महान योद्धा राजाची महागाथा सादर करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. हा केवळ एक चित्रपट नाही - सर्व अडचणींशी लढा देणाऱ्या, मुघल साम्राज्याच्या सामर्थ्याला आव्हान देणाऱ्या आणि कधीही विसरता न येणारा वारसा निर्माण करणाऱ्या योद्ध्याच्या सन्मानाची लढा आहे.'
संबंधित बातम्या