Richa Chadha Angry On Air India: बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चढ्ढा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अभिनेत्री अनेकदा कोणत्याही विषयावर मोकळेपणाने बोलताना दिसते. मात्र,यावेळी ऋचा चढ्ढा चांगलीच संतापली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने एका प्रसिद्ध विमान कंपनी आणि ट्रॅव्हल कंपनीला चांगलेच बोल सुनावले आहेत. अभिनेत्री ऋचा चढ्ढा हिने ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी मेक माय ट्रिप आणि एअर इंडियाच्या निकृष्ट सेवांवर चांगलीच टीका केली आहे. या कंपन्या प्रवाशांच्या सेवांकडे दुर्लक्ष करतात,असा आरोप देखील तिने केला आहे.
बिनधास्त बेधडक अभिनेत्री ऋचा चढ्ढा हिने एअरलाइन कंपनी एअर इंडिया आणि मेक माय ट्रिपच्या सेवांवर पोस्ट लिहून टीका केली तेव्हा,काही तासांतच तिच्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले होते. याबद्दल देखील तिने एक अपडेट पोस्ट केले होते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने या कंपन्यांना टोला हाणताच तिला काही तासांतच खर्चाचा पूर्ण परतावा मिळाला आहे.
याबद्दल सांगताना तिने म्हटले की, 'माझ्या सहाय्यकाने दोन आठवडे या गोष्टीचा पाठपुरावा केला,पण काही उपयोग झाला नाही. मेक माय ट्रिपने सांगितले की,एअर इंडियाकडून परतावा आलेला नाही. त्यामुळे विलंब झाला. मात्र,पोस्ट केल्यानंतर मला एअर इंडियाच्या सोशल मीडिया टीमकडून कॉल आला,त्यांच्या ग्राहक सेवेबद्दल नाही,मला वाटते की ते इमेजबद्दल चिंतित आहेत. खराब सेवेबद्दल त्यांना अजिबात काहीच वाटत नाही. ग्राहकांनो कृपया नेहमी अशा गोष्टींविरोधात आवाज उठवा. मोठ्या कंपन्या तुमची काळजी करत नाहीत,त्यांना त्यांच्या इमेजची काळजी असते.
अभिनेत्री ऋचा चढ्ढा पुढे म्हणाली की, 'त्यांची सेवा सामान्य प्रवाशांसाठी असेल तर,इतरांचे प्रश्न त्यांच्याकडून का सुटत नसावेत?कदाचित मी सेलिब्रिटी नसते तर माझ्या समस्येवर देखील त्यांना काही उपाय मिळाला नसता. आता माझ्या ट्विटमधील काही कमेंट्स वाचा. तुमच्याकडून न सुटलेले अनेक प्रश्न असलेले सामान्य ग्राहक यात सापडतील. कृपया त्यांचेही निराकरण करा. खरंच तुम्ही अशा लोकांची मदत केली तर,तुमच्यासाठी व्यावसायिक दृष्ट्या ती एक अतिशय महत्वाची कृती ठरेल.'