Happy Birthday Renuka Shahane : ‘लो चली में अपनी देवर की बारात लेके...’ असं म्हणत अभिनेत्री रेणुका शहाणे या रसिक प्रेक्षकांच्या लाडक्या ‘भाभी’ बनल्या. ७ ऑक्टोबर १९६६ रोजी महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे आज ५८वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या मनमोहक हास्याने आणि अभिनयाने चाहत्यांना भूरळ घालणाऱ्या रेणुका यांच्या करिअरची सुरुवात १९९२मध्ये 'हाच सुनबाईचा भाऊ' या मराठी चित्रपटाने झाली. मात्र, त्यांना खरी प्रसिद्धी १९९३ ते २००१ या काळात दुरदर्शनवर प्रसारित झालेल्या 'सुरभी' या कार्यक्रमामुळे मिळाली. सिद्धार्थ काक आणि रेणुका यांच्या सुत्रसंचालनामुळे हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय झाला.
रेणुका शहाणे यांच्या करिअरमध्ये एक टर्निंग पॉइंट आला. १९९४मध्ये आलेल्या 'हम आपके है कौन' या चित्रपटाने रेणुका शहाणे यांना एक वेगळी ओळख मिळाली. या चित्रपटामुळे त्यांची लोकप्रियता गगनाला भिडली होती. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेमुळे प्रेक्षक त्यांना मुलगी, बहीण, बायको आणि सून यांच्यातील आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून मानू लागले होते. त्यानंतर, रेणुका यांचा अभिनेता आशुतोष राणा यांच्याशी विवाह झाला. यानंतर त्यांनी काही काळासाठी अभिनयाला अलविदा म्हटले होते. मात्र, नंतर त्यांनी पुन्हा मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.
आशुतोष राणा यांच्यासोबतचा हा रेणुका यांचा दुसरा विवाह आहे. त्यांच्या पहिल्या लग्नाची कहाणी थोडी वेगळी आहे. रेणुका यांचे पहिले लग्न नॉन फिल्मी बॅकग्राउंड असलेल्या तरुणासोबत झाले होते. हे लग्न त्यांचे लव्ह मॅरेज होते. परंतु, काही कारणांमुळे हे नाते टिकले नाही. एका मुलाखतीत रेणुका यांनी सांगितले की, पहिल्या अपयशी विवाहातून त्या अनेक गोष्टी शिकल्या.
रेणुका आणि आशुतोष यांची ओळख राजेश्वरी सचदेव यांच्या माध्यमातून झाली होती. हंसल मेहता यांच्या 'ट्रायल'च्या सेटवर राजेश्वरीच्या भेटीमुळे दोघांची एकमेकांशी ओळख झाली. त्यावेळी रेणुका आशुतोष राणा यांना ओळखत नव्हत्या. मात्र, दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आशुतोषने केलेल्या फोननंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला, जो कालांतराने प्रेमात बदलला. आशुतोष राणाच्या गुरुजींनी त्याला सांगितले की, ‘हीच तुझ्यासाठी योग्य मुलगी आहे.’ यामुळे आशुतोषने रेणुका यांना लग्नाची मागणी घातली. रेणुका यांच्या आईला सुरुवातीला थोडे टेन्शन आले होते. कारण आधीच मुलीचा एक संसार मोडला होता. त्यात आता दोन्ही कुटुंबातील परंपरा खूप भिन्न होत्या. पण, नंतर रेणुका यांच्या समजूतदारपणामुळे त्यांच्या आईनेही या विवाहाला संमती दिली. २००१मध्ये दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर, रेणुका आणि आशुतोष यांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता.
संबंधित बातम्या