बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे रेखा. त्यांचे लाखो चाहते आहेत. केवळ भारतातच नाही तर भारता बाहेरही रेखा यांचे चाहते असल्याचे पाहायला मिळते. त्यांनी आतापर्यंत जवळपास ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण करिअरच्या सुरुवातीला त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला होता. त्यांच्या 'अंजाना सफर' चित्रपटातील एक किस्सा समोर आला आहे.
रेखा यांचा 'अंजाना सफर' हा चित्रपट १९६९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेते बिस्वजीत चॅटर्जी हे मुख्य भूमिकेत होते. त्यावेळी रेखा या केवळ १५ वर्षांच्या होत्या. पण चित्रीकरण सुरु असताना बिस्वजीत यांनी रेखासोबत गैरवर्तन केले होते. दिग्दर्शकाने अॅक्शन म्हटल्यानंतर बिस्वजीत यांनी रेखा यांना किस केले. ते जवळपास ५ मिनिटे किसिंग सीन शूट करत होते. पण हा सीन शूट करत असताना रेखा यांच्या डोळ्यात मात्र पाणी आले होते.
वाचा: मराठमोळ्या अभिनेत्रींना बिकिनीवरुन ट्रोल करणाऱ्यांना तेजस्विनी पंडितचे सडेतोड उत्तर
हा किस्सा रेखा यांनी यासीर उस्मान यांचे लेखन असलेली बायोग्राफी, ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’मध्ये सांगितला आहे. 'अंजाना सफर या चित्रपटाचे महबूब स्टुडिओत चित्रीकरण सुरु होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजा नवाथे यांनी केले. चित्रीकरणाच्यावेळी राजा आणि बिस्वजीत यांनी रेखा यांना न सांगता एक प्लॅन केला होता. बिस्वजीत आणि रेखा यांच्यात एक रोमँटिक सीन शूट होणार होता. पण जेव्हा राजा यांनी अॅक्शन म्हणताच बिस्वजीत यांनी रेखा यांना मिठीत घेतलं आणि ओठांवर किस केले. रेखा यांना याबाबत जराही कल्पना नव्हती. दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही बिस्वजित रेखा यांना किस करत होते. जवळपास ५ मिनिटे हे सुरुच होते. एकीकडे सर्वांना तो सीन आवडला तर दुसरीकडे रेखा यांना रडू कोसळले होते' असे या प्रसंगाविषयी लिहिण्यात आले आहे.