Happy Birthday Rekha : बॉलिवूडची अतिशय सुंदर आणि सदाबहार अभिनेत्री रेखा त्यांच्या दमदार अभिनयासोबतच सुंदर लूक, फिटनेस आणि मेकअपसाठी देखील ओळखल्या जातात. आज (१० ऑक्टोबर) अभिनेत्री रेखा त्यांचा ७०वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ रोजी झाला. वयाच्या सत्तरीतही त्यांचं सौंदर्य पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या रेखा यांना त्यांच्या आयुष्यात प्रेम मिळालं नाही. आजही त्या त्यांचं आयुष्य एकाकी जगतात. मात्र, त्या कायम आपल्या भांगेमध्ये कुंकू अर्थात सिंदूर लावतात. रेखा यांच्या आयुष्यात कुणीही नसताना, त्या नक्की कुणाच्या नावाने कुंकू लावतात, असा प्रश्न त्यांना अनेकदा विचारला गेला होता, ज्याचे उत्तर देखील त्यांनी दिले.
कधीकाळी रेखा यांचे संजय दत्तवर खूप प्रेम होते, असे बोलले जाते. इतकंच नाही तर, दोघांनी गुपचूप लग्न केल्याचेही म्हटले जाते. त्यामुळे रेखा लावत असलेले कुंकू हे संजय दत्तच्या नावाचे आहे, असा कयास अनेकांनी बांधला होता. रेखा यांचे लग्न मुकेश अग्रवाल यांच्याशी झाले होते. मात्र, लग्नाच्या काही काळानंतर मुकेश यांचे निधन झाले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखा यांनी स्वतः या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले होते की, त्या आपल्या कपाळावर कोणत्याही व्यक्तीच्या नावाने सिंदूर लावत नाहीत. तर, केवळ फॅशन म्हणून त्या कुंकू लावतात. रेखा यांना सिंदूर लावायला खूप आवडते. त्या नेहमीच साडी नेसून, सुंदर तयार होतात. त्यामुळे त्यांच्या या लूकला सिंदूर अगदी शोभून दिसते.
विनोद मेहरा आणि रेखा यांच्या लग्नाच्या चर्चांनीही बराच जोर धरला होता. मात्र, आजही या वृत्तांची पुष्टी झालेली नाही. रेखा यांनी एकदा सिमी ग्रेवालच्या शोमध्ये विनोद मेहरासोबत लग्न केल्याचं स्पष्टपणे नाकारलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, रेखा यांनी मंदिरात विनोद मेहरासोबत गुपचूप लग्न केले होते. पण, जेव्हा विनोदने पत्नी म्हणून रेखा यांना घरी आणले, तेव्हा त्यांच्या आईने रेखासोबतचे त्यांचे नाते मान्य केले नाही. असे म्हटले जाते की, विनोद यांच्या आईला रेखा आवडत नव्हत्या. या नात्यामुळे विनोद यांच्या आई त्यांना चपलेने मारायला गेलेल्या. त्यानंतर घरातील वाढते भांडण पाहून रेखा यांनी विनोद यांचे घर सोडले.
रेखा यांनी पहिल्यांदा १९८०मध्ये सिंदूर लावून सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्या होत्या. सिंदूर लावून, अगदी सजून धजून त्या ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांच्या लग्नात पोहोचल्या होत्या. त्यावेळी रेखा यांच्या कपाळावर सिंदूर पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. त्याच लग्नात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन देखील सहभागी झाल्या होत्या. मात्र, रेखाचे हे रूप पाहून जया बच्चन यांना चांगलीच धडकी भरली होती.
संबंधित बातम्या