मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून रविंद्र महाजनी ओळखले जायचे. अतिशय हँडसम अभिनेता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाच्या काही महिनाभरातच त्यांची पत्नी माधवी यांनी ‘चौथा अंक’ हे आत्मचरित्र पुस्तक प्रकाशित केले. मात्र प्रकाशित होताच हे पुस्तक चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचे कारण म्हणजे रविंद्र महाजनी यांच्या आयुष्यातील काही वादळी खुलासे.
माधवी महाजनी यांनी त्यांच्या या पुस्तकात रविंद्र महाजनी यांना व्यसन आणि जुगाराचा नाद असल्याचा खुलासा केला आहे. इतकाच नव्हे तर रवींद्र महाजनी हे पत्नी माधवीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत. रवींद्र महाजनी यांच्या रागीट स्वभावाची अनेक उदाहरण या पुस्तकात नमुद केली आहेत. रवींद्र महाजनी हे जुगारात लावण्यासाठी घरातले दागिने घेऊन जात असंही माधवी यांनी या पुस्तकात लिहिले आहे.
‘चौथा अंक’ या पुस्तकात माधवी महाजनी म्हणतात की “रवीला घरी यायला उशीर झाला की, मला भीती वाटायची, मी कपाट उघडून बघायची. एखादा तरी दागिना कमी झालेला असायचा. एकदा असंच जेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा मला घरात बसणं अशक्य झालं. मी उठले आणि तो जिथे जुगार खेळायला जायचा तिथले अड्डे शोधू लागले. एका जुगाराच्या अड्ड्यावर मला त्याची गाडी दिसली. मी सरळ जिना चढून वर गेले. काचेतून मला तो दिसला. मला पाहताच तो बाहेर आला. हाताला धरून मी त्याला घरी घेऊन आले. पण हे नेहमीच कसं शक्य होणार. मी त्याला थांबवू शकत नव्हते. मला म्हणायचा, ‘मी जेवढे दागिने जुगारात हरलो, ते सगळे मी जुगारातच जिंकून आणेन.’ पण ते कधीच झालं नाही. रवीला जे काही पैसे मिळत ते तो माझ्याकडे द्यायचा. त्याला हवे असले की मागून घ्यायचा. त्याचा हेतू वाईट नव्हता पण पुन्हापुन्हा तो त्याच चुकीच्या मार्गानं पैसे मिळवायला जायचा.” असा धक्कादायक खुलासा माधवी यांनी केला आहे.
वाचा: माहिती आहे का राज कपूर यांनी केले आहे 'या' मराठी सिनेमामध्ये काम, अशोक सराफ होते मुख्य भूमिकेत
चारित्र्य संशयावरून सांगताना माधवी यांनी लिहिले आहे की “पुण्याला आल्यावर वानखेडे स्टेडियमच्या अनुभवावर तेव्हा मला मोठ्या हॉटेलमधे चांगली नोकरी मिळू शकत होती. पण रवीचा स्वभाव संशयी असल्याने मी रात्रीच्या वेळात ड्यूटी करण्याचे टाळले. काही काळ मी नऊ ते पाचवाली नोकरी चांगल्या हॉटेलमधे केली” असं माधवी यांनी या पुस्तकात लिहिले आहे.