मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raveena Tandon: मी सुद्धा मुंबईत लोकल , बसने प्रवास केलाय; मलाही नको तिथे हात...

Raveena Tandon: मी सुद्धा मुंबईत लोकल , बसने प्रवास केलाय; मलाही नको तिथे हात...

Payal Shekhar Naik HT Marathi
Jul 03, 2022 04:19 PM IST

आरेमध्ये कारशेड उभारण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या रवीनावर(raveena tandon) वैयक्तिक ताशेरे ओढले गेल्याने ती संतापली आणि तिने सडेतोड शब्दात उत्तर देत सगळ्यांची बोलती बंद केली.

रवीना टंडन
रवीना टंडन

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने (raveena tandon)आज सोशल मीडियावर जणू आग लावली आहे. आपल्या सडेतोड उत्तरांनी तिने ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. रवीनाने आपणही मुंबई लोकल आणि बसने प्रवास केल्याचं सांगत आपल्यासोबत देखील छेडछाडीच्या घटना घडल्याचा खुलासा केला आहे. हे प्रकरण तेव्हा सुरू झालं जेव्हा रवीनाने आरे वाचवण्यासाठी मेट्रो कारशेडला(aarey metro carshed) विरोध केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरे येथे मेट्रो ३चं कारशेड उभारण्यास परवानगी दिल्याने नव्या वादाला तोंड फुटलं. त्यात रवीना, दिया मिर्झा यांसारखे कलाकार आरे वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतायत.

रवीनाच्या एका पोस्टवर एका युझरने तिला प्रश्न विचारत लिहिलं, 'मुंबईतील मिडलक्लास व्यक्तीला कोणत्या परिस्थितीतून जावं लागत याची तुम्हाला काही माहिती तरी आहे का?' या प्रश्नावर उत्तर देताना तिने लिहिलं, ' जेव्हा मी टीनएजर होते, मी सुद्धा मुंबईच्या लोकलमधून आणि बस प्रवास केलाय, माझ्यासोबत देखील अनेकदा छेडछाड झालीये, मलाही चिमटा काढला गेलाय. माझ्यासोबतही ते सगळं झालंय ज्यातून इतर महिलांना आणि मुलींना जावं लागतं. पण आपण फक्त एका प्रोजेक्टसाठी जबाबदार नाही आहोत. शहरात विकास करा पण त्याआधी आपल्याला पर्यावरण आणि वन्य प्राण्यांच्या जीवनाचा देखील विचार केला पाहिजे. ती देखील आपलीच जबाबदारी आहे.'

 

यासोबतच आणखी एका युझरने रवीनाला प्रश्न विचारत लिहिलं, 'तू कधी लोकल ट्रेनने प्रवास केला आहेस?' त्यावर उत्तर देत तिने लिहिलं, '१९९१ पर्यंत मी सर्वसामान्य मुलीप्रमाणे लोकलने प्रवास केलाय. एक मुलगी असल्यामुळे तुमच्यासारख्या नावं नसलेल्या अनेक ट्रोलर्सच्या शारीरिक शोषणाचा देखील सामना केलाय. नागपूरचा आहेस, तुमचं शहर हिरवंगार आहे. नशीबवान आहात. कुणाच्याही यशावरून किंवा कमाईवरून त्याच्यावर असूया ठेवू नका.'

IPL_Entry_Point