Raveena Tandon Apologies To Fans:बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन नेहमीच तिच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. रवीनाने पुन्हा एकदा ओटीटीच्या माध्यमातून चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आहे. ही अभिनेत्री लवकरच अक्षय कुमारसोबत'वेलकम टू द जंगल'मध्ये दिसणार आहे. नुकतीच रवीना टंडनने तिच्या चाहत्यांची माफी मागितली आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक लांबलचक पोस्टही शेअर केली असून, माफी मागण्याचे कारणही सांगितले आहे. रवीनाच्या म्हणण्यानुसार, तिला एका जुन्या घटनेमुळे धक्का बसला आहे आणि यामुळे ती खूप घाबरली आहे. रवीनाने काही दिवसांपूर्वी लंडनमधील तिच्या चाहत्यासोबत फोटो क्लिक करण्यास नकार दिला आणि ती तिथून पळून गेली होती.
रवीना टंडनने तिच्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, नुकतीच ती लंडनमध्ये होती आणि तिचे चाहते तिच्याकडे सेल्फी घेण्यासाठी आले होते, परंतु त्यावेळी ती घाबरली आणि तेथून पटकन निघून गेली. रवीनाने काही महिन्यांपूर्वी झालेली एक घटना तिच्या या प्रतिक्रियेमागचे कारण असल्याचे सांगितले आहे. रवीनाने लिहिले की, ‘हे फक्त रेकॉर्डमध्ये ठेवण्यासाठी आहे. काही दिवसांपूर्वी मी लंडनमध्ये फिरत होतो आणि काही लोक माझ्याकडे आले, मी इथल्या गुन्हेगारी परिस्थितीबद्दल इतक्या गोष्टी ऐकल्यात ज्या अजिबात चांगल्या नाहीत. म्हणून जेव्हा त्यांनी मला विचारले की, मी अभिनेत्रीच आहे का?तर मी नाही म्हटलं आणि तिथून पटकन पळ काढला.त्यावेळी मी पण एकटीच होते.’
रवीना पुढे लिहिते, ‘मला वाटते की, त्या व्यक्तीला फक्त एक फोटो हवा होता. मी त्यासाठी नेहमीच तयार असते. पण काही महिन्यांपूर्वी वांद्रे येथे घडलेल्या घटनेनंतर मी थोडी घाबरले आहे आणि धक्काही बसला आहे. म्हणून जेव्हा मी लोकांसोबत असते, तेव्हा मी ठीक असते. पण आजकाल मी एकटी असताना थोडी घाबरते. पण, तो चाहता निष्पाप असल्यामुळे मी त्यांला फोटो द्यायला हवा होता. पण, मी खूप घाबरले आणि पटकन तिथून निघाले. त्यावेळी एका गार्डकडे मदत मागितली. या घटनेनंतर मला खूप वाईट वाटत आहे आणि ते वाचत असतील तर मी त्यांची माफी मागतो की, त्यांना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. मला माफ करा आशा आहे की, आपण पुन्हा भेटू आणि एकत्र फोटो काढू.’
रवीनाच्या या पोस्टनंतर तिला ती व्यक्तीही सापडली आहे. रवीनाच्या ट्विटवर चाहत्याने प्रतिक्रियाही दिली आहे. त्याच्या कमेंटला रवीनानेही उत्तर दिले आहे. या पोस्टनंतर प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न येत असेल की, रवीना टंडनसोबत नेमके काय झाले होते? ही गोष्ट जून २०२४ची आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एका व्यक्तीने रवीना आणि तिच्या ड्रायव्हरवर दारूच्या नशेत तिच्या कुटुंबातील महिलेला कारने धडक दिल्याचा आरोप केला होता. व्हिडीओमध्ये रवीना सर्वांना शांत करताना दिसत होती, पण समोर उपस्थित असलेले लोक रवीनाला शिवीगाळ करत होते आणि तिला धक्काबुक्कीही करत होते. पण, जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले, तेव्हा वेगळी गोष्ट समोर आली. रवीना टंडन आणि तिच्या ड्रायव्हरवरील सर्व आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले. या घटनेनंतर रवीना थोडी घाबरली आहे.