Ratan Tata Death News Viral Video: अवघ्या भारतीयांच्या मनात नेहमीच मानाच्या स्थानावर विराजमान असलेले प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. वयाच्या ८६व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सगळ्यांवरच दुःखाचा डोंगर कोसळला. ही दुःखद बातमी ऐकताच सगळ्यांच्याच डोळ्यांत अश्रू तरळले होते. रतन टाटा यांना अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. दरम्यान आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून रतन टाटा यांच्याबद्दल लोकांच्या मनात किती आदर होता, याची कल्पना येते.
९ ऑक्टोबरच्या रात्री रतन नवल टाटा यांचे निधन झाले. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गरबा खेळण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमलेले दिसत आहेत. परंतु, कुणीही गरबा खेळताना दिसत नाही. खरंतर, काही वेळ आधी इथे अतिशय मोठ्या जल्लोषात गरबा सुरू होता. पण, जेव्हा या लोकांना रतन टाटा यांच्या निधनाची बातमी कळली, तेव्हा तिथे उपस्थित सगळ्यांनाच धक्का बसला. यानंतर त्यांनी गरबा काही काळ थांबवून रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली, ज्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, सर रतन टाटा यांच्या सन्मानार्थ नेस्को गोरेगावमध्ये गरबाही थांबवण्यात आला होता. महान व्यक्तिमत्त्व, सगळ्यांचे लाडके सर रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.' या व्हिडीओमध्ये शेकडो लोक गरबा थांबवून रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहताना दिसली आहेत. यावरून लक्षात येतं की, लहान असो वा मोठा व्यक्ती, प्रत्येकाच्या मनात रतन टाटा यांच्याविषय खूप प्रेम आणि आपुलकी होती. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सोशल मीडियावर देखील शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते.
व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक लोक भावूक झाले आहेत. अनेकांनी या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘सर रतन टाटा यांच्याविषयी किती प्रेम आणि आदर होता, हे यावरून दिसून येते.’ तर, दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘आज प्रत्येकाच्या मनातील एक आदर्श व्यक्ती हे जग सोडून गेली आहे.’ तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘भारताने खरा हिरा गमावला आहे.’ तर, आणखी एकाने लिहिले की, ‘सर तुम्ही नेहमीच मनात जिवंत राहाल.’
संबंधित बातम्या