ते म्हणतायत तुम्ही गेलात…; कधीकाळी करत रतन टाटा यांना डेट करणाऱ्या अभिनेत्रीला शोक अनावर!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ते म्हणतायत तुम्ही गेलात…; कधीकाळी करत रतन टाटा यांना डेट करणाऱ्या अभिनेत्रीला शोक अनावर!

ते म्हणतायत तुम्ही गेलात…; कधीकाळी करत रतन टाटा यांना डेट करणाऱ्या अभिनेत्रीला शोक अनावर!

Published Oct 10, 2024 08:24 AM IST

Simi Garewal Reaction on Ratan Tata Demise : बॉलिवूड अभिनेत्री सिमी ग्रेवालने रतन टाटा यांची आठवण काढत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सिमीने स्वतःचा आणि रतन टाटांचा एक जुना फोटो शेअर करत आपल्या मित्राचा अखेरचा निरोप घेतला आहे.

सिमी ग्रेवाल आणि रतन टाटा
सिमी ग्रेवाल आणि रतन टाटा

Ratan Tata Passes Away : भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे असे व्यक्तिमत्त्व होते, ज्यांच्यावर सगळ्यांनीच भरभरून प्रेम केले. आता बॉलिवूडपासून इंडस्ट्रीपर्यंत सर्वजण रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहत आहेत. यादरम्यान, रतन टाटा यांची मैत्रीण-बॉलिवूड अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनीही रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सिमी यांनी आपला आणि रतन टाटा यांचा एक फोटो शेअर करत लिहिले की, ‘अलविदा माझ्या मित्रा’.

रतन टाटा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर एक काळ असा होता जेव्हा ते बॉलिवूड अभिनेत्री सिमी ग्रेवालला डेट करत होते. सिमी ग्रेवालने एका जुन्या मुलाखतीत रतन टाटांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. आता रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांची आठवण काढत सिमीने रतन टाटांसोबतचा आपला एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं की, ‘ते म्हणतायत तुम्ही गेलात... तुमच्या जाण्याचं दु:ख सहन करणं कठीण आहे... खूप अवघड... अलविदा, मित्रा.’

२०११ मध्ये एका मुलाखतीत सिमीने रतन टाटा यांचं एका शब्दात वर्णन करताना त्यांना ‘परफेक्शन’ म्हटलं होतं. याचवेळी सिमी ग्रेवाल यांनी आपण कधीकाळी रतन टाटांसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, याची कबुली दिली होती. याविषयी सांगताना सिमी म्हणाल्या की, ‘रतन आणि माझं नातं खूप जुनं आहे. रतन टाटा म्हणजे परफेक्शन आहेत. त्यांच्याकडे विनोदबुद्धी आहे, ते अतिशय विनम्र व्यक्ती आहेत आणि आदर्श गृहस्थ आहेत. पैसा हा त्यांच्यासाठी कधीच प्रेरक शक्ती राहिलेला नाही. ते परदेशात जितके रिलॅक्स होते, तितके ते भारतात नव्हते. मात्र, त्यांनी सगळ्यांसाठी खूप काही केलंय.’

इथे घेता येणार रतन टाटांचं अंत्यदर्शन

आज म्हणजेच गुरुवारी (१० ऑक्टोबर) रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी एनसीपीएमध्ये ठेवण्यात येणार आहे. रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत झाला होता. त्यांच्या आईचे नाव सुनू टाटा होते आणि ते नौशेरवानजींचे पुत्र होते. रतन टाटा १० वर्षांचे असताना त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता.

Whats_app_banner