पुष्पा २ द रुल या सिनेमातील श्रीवल्लीच्या भूमिकेत रश्मिका मंदानाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटातील अभिनयासाठी रश्मिका मंदानाचे कौतुक होत आहे. एका चाहत्याच्या कौतुकाला उत्तर देताना रश्मिकाने अल्लू अर्जुन आणि रणबीर कपूरला 'ती आज जी अभिनेत्री आहे' त्याचे श्रेय दिले. पण रश्मिकाने अल्लू अर्जुन आणि रणबीर कपूरला तिच्या यशाच्या श्रेय का दिले? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्यामागचे कारण...
सध्या सगळीकडे पुष्पा २ सिनेमाची चर्चा दिसत आहे. चाहते सोशल मीडियावर देखील अल्लू अर्जुन आणि श्रीवल्लीसाठी पोस्ट शेअर करताना दिसत आहे. नुकताच एका चाहत्याने एक्स सोशल मीडिया अकाऊंटवर रश्मिकाच्या अॅनिमलमधील रणबीर कपूर आणि पुष्पा २ मधील श्रीवल्लीचा फोटो कोलाज करुन शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत चाहत्याने, "दोन अल्फा पुरुषांवर रश्मिका नावाच्या एका मुलीचे वर्चस्व आहे" या आशयाचे कॅप्शन दिले आहे. ही पोस्ट पाहून रश्मिकाने लगेच उत्तर दिले आहे.
रणबीर सोबतचा आणि अल्लू अर्जुनसोबतचा फोटो पाहून रश्मिकाने चाहत्याला रिप्लाय केला आहे. 'या माणसांसोबत परफॉर्म केल्याने मी करिअरमध्ये एक उंची गाठली आहे. या माझ्या भूमिका पाहून मीच चकीत झाले होते. आज मी जी काही अभिनेत्री ती या मला आवडलेल्या दोन मनमोकळ्या कलाकारांमुळे' या आशयाची कमेंट रश्मिकाने केली आहे.
सोशल मीडियावर रश्मिकाची ही कमेंट तुफान व्हायरल झाली आहे. अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने "जेव्हा परफॉर्मन्सची वेळ येते तेव्हा रश्मिका नेहमीच उत्कृष्ट प्रदर्शन करते" असे म्हणत रश्मिकाचे कौतुक केले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, "माफ करा मॅडम..... मी गीता गोविंदम आणि कॉम्रेडची फॅन आहे, एवढेच नव्हे तर या दोन कलाकारांमध्ये आणखी एका @TheDeverakonda राऊडीला पण घ्या" असे म्हटले आहे. आणखी एका यूजरने देखील अभिनेता विजय देवरकोंडाचे नाव जोडण्यास देखील सांगितले आहे.
वाचा: 'पुप्षा २' पाहायला जाताय? थांबा! आधी हे वाचा आणि मग निर्णय घ्या
पुष्पा २ : द रूल मधील रश्मिका आणि अर्जुनची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडली आहे. त्यांच्या 'पीलिंग्स' या गाण्याला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटगृहांमध्ये चाहते या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या चित्रपटाच्या अॅक्शन आणि मनोरंजक दृश्यांसाठी, विशेषत: "गंग्म्मा थल्ली जथारा" या जिवंत दक्षिण भारतीय लोकउत्सवावर प्रकाश टाकणारा हा सिनेमा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पुष्पा 2: द रूल हा 2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वल आहे. यात फहाद फसिल मुख्य खलनायकाच्या भूमिकेत आहे. एसपी भंवर सिंह शेखावत आणि अनसूया भारद्वाज मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई करताना दिसत आहे.